
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पुन्हा अडचणीत आले आहेत. शिरसाट यांनी आपल्या सिडकोच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात नवीन मुंबईतील बिवलकर कुटुंबाला ५ हजार कोटी रुपयांची १५० एकर जमीन देत मोठा आर्थिक फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सोमवारी (दि.१८) पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
सन २०२४ मध्ये सिडकोचे अध्यक्ष होताच संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याच्या आदेशावर सही केली. मराठा साम्राज्यासोबत गद्दारी करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला जमीन देऊन संजय शिरसाट यांनी स्थानिक भूमिपुत्रांशी गद्दारी केली आहे. इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्या व्यक्तीशी हातमिळवणी संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले की, ब्रिटिश काळात नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबीयांनी मराठा साम्राज्याविरोधात इंग्रजांना मदत केली. त्या बदल्यात त्यांना रोहा, पनवेल, अलिबाग या भागातील चार हजार एकरपेक्षा जास्त जमीन बक्षीस म्हणून देण्यात आली. १९५९ साली बिवलकर कुटुंबाने सिलिंग कायद्यातून ही जमीन वाचविली. मात्र १९७१ साली ही जमीन सरकारकडे जमा झाली. १९९० साली त्यांनी आपली जमीन परत मिळावी म्हणून मागणी केली.
त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी ती जमीन माघारी देण्याचा अर्ज फेटाळला. त्यानंतर कोर्टात हा विषय सुरू होता. दरम्यान, १९७१ मध्ये नवीन सिडकोने विविध कामांसाठी जमिनी घेण्याचा निर्णय घेतला. १९८३ साली या जमिनी ताब्यात घ्यायला सुरुवात झाली. १९८७ मध्ये महसूल विभागाला हाताशी धरून बिवलकर कुटुंबाने जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. १९९० साली शरद पवार, दी. बा. पाटील यांनी साडेबारा टक्के योजना आणली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पैसा मिळू लागला. त्यावेळी बिवलकर यांनी सरकारकडे आपली जमीन आहे. त्या बदल्यात साडेबारा टक्के योजनेचा फायदा द्या, अशी मागणी केली होती. त्यावेळी एमडी अनिल डिग्गीकर होते. त्यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर आलेल्या तीन एमडींनी बिवलकर कुटुंबाची मागणी फेटाळून लावली.
थेट भ्रष्टाचाराचा आरोप
संजय राऊत यांच्याशीही माझे याविषयी बोलणे झाले आहे. त्यांनी आम्ही सोबत आहोत, असे सांगितले आहे. काँग्रेसही आंदोलनात सोबत असणार आहे. तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार आहे. याबदल्यात शिरसाट यांनी आर्थिक व्यवहार केला आहे. मंत्री संजय शिरसाट यांचा थेट सहभाग या भ्रष्टाचारात आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
स्पेशल टास्क फोर्समार्फत चौकशीची मागणी
इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्या व्यक्तीशी हातमिळवणी संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा. जर शिरसाट यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि उत्तर द्यावे. संजय शिरसाट यांना १५ दिवस सिडको अध्यक्षपदी नेमून होताच त्यांनी १५० एकर जमीन बिवलकर कुटुंबाला दिली. त्यानंतर सरकार आल्यावर उर्वरित जमीन विवलकर यांना देण्याचा प्रयत्न होता. संजय शिरसाट यांना १०० कोटी रुपयांचा मलिदा मिळाला असेल, असा आमचा संशय आहे. त्यांच्या पक्षालासुद्धा चारशे ते पाचशे कोटी मिळाले असणार आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार स्पेशल टास्क फोर्स नेमा किंवा निवृत न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.