
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी – रवि राठोड
पालघर (सफाळे) : सफाळे परिसरात सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा जाणवत असून स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांमध्ये गॅसच्या गाड्या आल्या तरी नागरिकांना सिलिंडर मिळत नाही. इतकेच नव्हे तर सफाळ्यातील मुख्य ठिकाणीही काहींना सिलिंडर मिळू शकला नाही.
या पार्श्वभूमीवर धनेश गावड (उप सरपंच व ग्रामस्थ, टेंभी खोडावे) यांनी बाहेरगावाहून आलेल्या कामगारांच्या राहत्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता, तेथे एचपी व भारत गॅसचे सिलिंडर आढळले. मात्र, या कामगारांकडे कोणतीही अधिकृत गॅस जोडणी नसतानाही हे सिलिंडर त्यांच्या हातात कसे पोहोचले, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिकांचा आरोप आहे की, अनधिकृत रित्या आर्थिक लाभासाठी या कामगारांना व इतर ठिकाणी गॅस सिलिंडर पुरवले जात आहेत. अशा प्रकारे स्थानिकांच्या वाट्याला येणारा गॅस बाहेर वळवला जात असल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे सिलिंडर पुरवणाऱ्या लोकांवर काय कारवाई होणार? असा थेट प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
या संदर्भात संबंधित गॅस एजन्सी व प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व स्थानिकांना गॅस सिलिंडर नियमित व सुरळीत मिळतील याची खात्री करावी, अशी मागणी होत आहे.