
गिरीश महाजन काय म्हणाले ?
शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) दसरा मेळावा रद्द करून उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करायला हवी, असे आवाहन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
गोदावरी नदीच्या पुरामुळे काठावरील भागात झालेल्या नुकसानीची मंत्री महाजन यांनी पाहणी केली. राज्यात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमीन, माती वाहून गेली. नुकसानीबाबत पंचनामे सुरू असून त्यास काही कालावधी लागेल. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह काही भागात आजही शेतांमध्ये पाणी आहे. प्रशासकीय यंत्रणा आपदग्रस्तांना भोजन व तत्सम सुविधा देण्यात गुंतलेली आहे. शेतातील पाणी ओसरून जमीन दिसायला लागल्यावर अशा ठिकाणी पंचनामे केले जातील, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी ओसरताच पंचनामे तातडीने पूर्ण करून शासन स्तरावरून मदत करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये पाऊस थांबल्याने पूर ओसरला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन केल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. नदीकाठावरील व्यावसायिकांनाही पूराचा फटका बसला. ज्या गावांतील घरांमध्ये पाणी शिरले आहे, त्यांचे पंचनामे सुरू असून संरक्षणासाठी नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करून त्यांची निवाऱ्याची व भोजनाची सोय प्रशासनाकडून करण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडले. शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) दसरा मेळावा रद्द करून उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करायला हवी, असेही त्यांनी सूचित केले. उद्धव ठाकरे हे नुकसान झालेल्या भागात पोटतिडकीने गेले, ज्या भाषेत ते बोलत आहेत, त्यांनी ते केले पाहिजे. महाविकास आ्घाडीच्या सरकारमध्ये असताना नुकसानग्रस्त भागास भेट देताना ठाकरे यांच्यासाठी लाल गालीचा अंथरण्यात आला होता. त्याच्या चित्रफिती समाजमाध्यमात असल्याकडे महाजन यांनी लक्ष वेधले.
करोना काळात उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडले नव्हते. सरकारमध्ये असताना ठाकरे यांची भाषा काय होती आणि विरोधात असताना काय आहे, असा प्रश्न त्यांनी केला. खा. संजय राऊत यांची भाषा असंसदीय झाली असून करोना काळातील त्यांचे पराक्रम सर्वांना माहिती असल्याचा टोला महाजन यांनी हाणला.