
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनिधी -रवि राठोड
पालघर : पालघर जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा विभागातील कंत्राटदारांचे तब्बल एक हजार कोटी रुपयांहून अधिक बिले शासनाकडे रखडली असून, वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनेच मिळाल्याने अखेर ठेकेदार रस्त्यावर उतरले.
भर पावसात काळ्या फिती बांधून शेकडो ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. कार्यालयासमोर ठिय्या देऊन “काम केले, पैसे कुठे?”, “निधी नाही तर नवनवीन योजना का आणता?” अशा घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला.
जिल्ह्यातील रस्ते, पूल, साकवे, पाणीपुरवठा योजना, शासकीय इमारती, शाळा आणि अंगणवाड्या यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असूनही त्यांच्या बिलांचा प्रश्न सोडवला गेलेला नाही. या थकबाकीमुळे केवळ ठेकेदार नव्हे तर हजारो मजुरांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
आंदोलनाला मजूर सहकारी संस्थांनीही पाठिंबा दिला. “बिले तातडीने फेडली नाहीत तर मजुरांना घेऊन मोठ्या प्रमाणावर ठिय्या आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संस्थेच्या प्रतिनिधींनी दिला. अखेर जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी निवेदन शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले, अशी माहिती कंत्राटदार संघटनेचे अतुल घरत आणि मजूर सोसायटीचे संचालक कुशल राऊत यांनी दिली.