
फक्त एक पुरावा अन् गेमच पलटला !
कोणावर खोटा आरोप लावणं बऱ्याचदा महागात पडत असल्याचं पाहायला मिळतं. राजस्थानच्या अलवारमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत देखील असंच काहीसं घडलं. संबंधित महिलेने तिच्या अल्पवयीन पुतण्यावर बलात्काराचा आरोप करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
मात्र, कोर्टाने उलट तक्रार करणाऱ्या महिलेलाच दोषी ठरवलं असून तिला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खरंतर, फक्त पुराव्यामुळे या संपूर्ण घटनेमागचं सत्य समोर आलं.
पुतण्याविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल
सरकारी वकील प्रशांत यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिजारा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात राहणाऱ्या महिलेनं 11 ऑगस्ट रोजी तिच्या अल्पवयीन पुतण्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. संबंधित महिलेनं एफआयआरमध्ये म्हटलं की तिचा पुतण्या गेल्या 6 महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करत होता. तसेच, त्याने तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली असल्याचा आरोप महिलेनं केलं.
घरी कोणी नसताना घरी बोलवायची अन्…
तपासादरम्यान, पोलिसांनी दोघांचे कॉल रेकॉर्डिंग मिळवले. सुमारे 6 महिन्यांत दोघांचं 832 वेळा मोबाईलवर बोलणं झालं होतं. कॉल रेकॉर्डिंग तपासल्यानंतर पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटलं. महिलेनं ज्यावेळी पुतण्यावर बलात्काराचा आरोप केला, त्यावेळी तो अल्पवयीन होता. प्रकरणाचा तपास केला असता महिलेवर बलात्कार झाला नसून उलट कुटुंबातील सदस्य बाहेर गेल्यावर ती स्वतः तिच्या पुतण्याला घरी बोलावत असल्याचं समोर आलं.
20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रकरणासंदर्भात सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने महिलेला दोषी ठरवले आणि तिला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यावेळी संबंधित महिला गर्भवती होती. तिला एक मुलगा असून तो 9 महिन्यांचा आहे. आरोपी महिलेनं तिच्या मुलाला तुरुंगात घेऊन जाण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. मूल लहान असल्यानं न्यायालयाने आईचा अर्ज स्वीकारला.