
मोदी सरकारच्या कारभारावर अण्णा हजारे काय बोलून गेले ?
मतचोरीवरून विरोधकांनी सरकारला घेरलंय. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सरकारविरोधात बोलत नसल्याने त्यांना पुण्यात लक्ष्य करण्यात आले. यावर लेट्सअप मराठीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर भाष्य केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मला कधी फोन आला नाही. मी कधी कोणत्या पक्षासोबत गेलो नाही. त्यांचं सरकार आणण्यात माझा काही संबंध नाही. मी फक्त समाज अन् देश डोळ्यासमोर ठेवला. कधी कोणता पक्ष आणि पार्ट्या पाहिल्या नाही. समाजाच्या भल्यासाठी जे योग्य असेल ते करीत राहिलो, असं देखील अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलंय.
काही लोकांनी फसवलं
एक कालचा पोरगा माझ्याबरोबर राहिला. माझ्या बरोबर राहता-राहता दिल्लीचा मुख्यमंत्री झाला. मी त्याचं नाव सोडून दिलं. आजपर्यंत काही नाव घेतलं नाही. कारण आपला न त्याचा काही संबंध नाही, असा टोला त्यांनी अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे. काही लोकांनी फसवलं असेल, पण कुठे फसवलं अन् कसं फसवलं हे माहीत नाही, असं देखील अण्णांनी स्पष्ट केलंय. कारण माझं मन आणि जीवन स्वच्छ आहे. जे करायचं ते चांगलं करायचं, असं देखील त्यांनी म्हटलंय.
राजकीय स्वार्थासाठी फायदा करून घेतला
काही लोकांनी राजकीय फायदा करून घेतला, राजकीय स्वार्थासाठी ते टपलेले असतात. मी खूप सतर्क राहिलो. राजकीय पक्षांपासून मी दूर राहिलो, असं देखील अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. मोदींचं आणि माझं अजिबात बोलणं होत नाही. पंतप्रधान मोदींच्या कारभारावर बोलताना अण्णा हजारे म्हटले की, चलती का नाम गाडी. रूक गये तो खटारा. चांगल्याचा चांगलं म्हणायचं, वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे. राजकारणात सगळं चांगलं राहत नाही. कुठे न कुठे स्वार्थ असतो, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
सरकारपासून मी दूर
आताच्या सरकारवर अण्णा हजारे टीका करत नाही. यावर बोलताना ते म्हणाले की, बोट दाखवलं ना. सरकारपासून मी दूर आहे. सरकारच्या जवळ जात नाही. मी एक संन्यासी माणूस आहे. सत्ता नाही, घर नाही, दार नाही, मोह नाही, माया नाही, धन नाही, असं देखील अण्णा हजारे यांनी म्हटलंय. समाजाला जिथं गरज आहे, तिथे मी भूमिका घेतली आहे. निर्णय घेतले, कायदे केले, असं देखील अण्णा हजारे यांनी म्हटलंय.
समाजाचं हित कुठे आहे?
माहितीचा अधिकार यावर बोलताना ते म्हणाले की, एवढा सुंदर कायदा. म्हणून मी तो कायदा केला. त्यासाठी आंदोलनं केले. जनता झोपलेली आहे. जनता जागी झाली पाहिजे. जनता देशाची मालक आहे. पक्ष आणि पार्ट्या मालक नाही. म्हणून मी जनतेच्या वतीने नेहमी आक्षेप घेतो, समाजाचं हित कुठे आहे? हे पाहिलं आहे, असं देखील अण्णा हजारे यांनी म्हटलंय. मी 22 उपोषणं केली. त्याचा माझ्या तब्येतीवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट माझं आयुष्य वाढलं, असं देखील अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.