
भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी आज (25 ऑगस्ट) वराह जयंती साजरी केली. वराह जयंती साजरी करण्यावरून राज्यात आधीच टीका-टिपण्णी सुरू झाली आहे. आता नितेश राणे यांनी तीन ठिकाणी वराह जयंती साजरी केल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी नितेश राणे यांना लक्ष्य केले आहे.
यावरून नितेश राणे यांचा हा निर्णय सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला रुचलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्री नितेश राणे यांनी चेंबूर, नवी मुंबई आणि ठाण्यात सोमवारी (25 ऑगस्ट) वराह जयंती साजरी केली. तिथे त्यांनी वराह पूजन केले, महाआरती केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने नितेश राणे यांना जोरदार टोला लगावून सल्ला दिला आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 20 ऑगस्ट रोजी पत्र पाठवले होते. त्यात 25 ऑगस्ट रोजी वराह जयंती अधिकृत साजरी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यानंतर आज त्यांनी वराह जयंती साजरी केली. यावरून अमोल मिटकरी यांनी थेट बोल सुनावले आहेत. ‘हे रानडुक्कर शेतकऱ्यांचे नुकसान करतात. शेतकऱ्यांचं दुखणं ऐकून घेण्याऐवजी सरकारमधीलच मंत्री शेतकऱ्यांच्या शत्रूची जाहीर आरती करत असतील, त्यांना संरक्षण देणार असतील तर याला शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणतात. वराह पुजनाचा त्यांनी घरात दोन-चार डुक्कर बांधावीत आणि रोज आरती करावी. वराहाला डुक्कर म्हणतात. याला आमची काही हरकत नाही.’
वराह जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भगवान विष्णू यांनी वराह अवतार घेतला म्हणून भाजप वराह जयंती साजरी करत आहे. मग भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला म्हणून 31 मार्च रोजी मत्स्य जयंती का साजरी केली नाही, असा सवाल सचिन सावंत यांनी विचारला आहे. एवढेच नाही तर मासे ताव मारून खाताना काय आठवते, असा सवालदेखील त्यांनी केला आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोलापूरमध्ये वराह जयंतीच्या निमित्ताने भाजपसह नितेश राणे यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. त्याला नितेश राणे यांनीही उत्तर दिले आहे. उबाठाला मुल्ला मौल्लवी जवळचे वाटतात तसेच उद्धव ठाकरेंचे अर्धे धर्मांतर झाले आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे. तसेच वराह म्हणजे विष्णूचा तिसरा अवतार आहे. आणि वराह जयंतीविरोधात आंदोलन करत असाल तर यापेक्षा मोठा हिंदूंचा अपमान नाही, असेही त्यांनी सुनावले आहे.