
ट्रम्प यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ऑपरेशन सिंदूरबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याकाळात आपण फोन केल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले आहे.
पण या संवादादरम्यान आपण त्यांना टेरिफबाबत इशारा दिल्याची कबुली दिली आहे. एवढा टेरिफ लावू की डोकं चक्रावून जाईल. त्यानंतर पाच तासांतच चक्र फिरून भारत-पाकिस्तानातील संघर्ष थांबल्याचा मोठा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. त्यानंतर पाकनेही भारतातील काही ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही देशांत सुरू असलेला संघर्ष थांबविण्यासाठी आपणच मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प यांनी त्याचवेळी केला होता. ते सातत्याने यावर जोर देत आले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदींशी नेमकी चर्चा काय झाली, यावर भाष्य करत खळबळ उडवून दिली आहे.
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी सांगितले की, ‘भारत आणि पाकिस्तानातील युध्द मी थांबवले नसते तर आण्विक युध्द झाले असते. सात जेट विमाने पाडण्यात आली आल्याचे पाहून मी वाटले की योग्य होत नाही. 150 मिलियन डॉलरचे विमान पाडले. कदाचिक आकडा यापेक्षाही मोठा असेल.’ टॅम्प यांनी यापूर्वी पाच विमाने पाडल्याचा दावा केला होता.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी चर्चा करत होतो. ते खूप चांगले व्यक्ती आहेत, असे सांगत ट्रम्प म्हणाले, मी त्यांनी विचारले की तुम्ही आणि पाकिस्तानदरम्यान हे काय चाललं आहे? नंतर मी पाकिस्तानशी व्यापाराविषयी बोललो. मी विचारले की तुमच्यात आणि भारतादरम्यान काय सुरू आहे? द्वेष खूप होता. हे खूप काळापासून सुरू आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की, मी तुमच्याशी व्यापार करार करू इच्छित नाही. तुम्ही लोक एक दिवस आण्विक युध्द कराल. ते मला म्हणाले, आम्हाला डील करायची आहे. मग मी म्हटले, मला उद्या पुन्हा कॉल करा, पण आम्ही तुमच्याशी कोणताही करार करणार नाही. जर केला तर आम्ही तुमच्यावर एवढा जास्त टेरिफ लावू की डोकं चक्रावून जाईल. त्यानंतर पाच तासांच्या आत सगळं काही झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.
आता पुन्हा सुरू झाले तर मी काही सांगू शकत नाही. पण मला वाटत नाही की असे होईल. जर झाले तर मी थांबवीन. अशा गोष्टी आम्ही होऊ देणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ट्रम्प यांच्याशी फोनवरून मोदींचा संवाद झाल्याचा दावा भारताने यापूर्वी फेटाळून लावला आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनीही संसदेत अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींशी बोलणे झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे ट्रम्प यांच्या दाव्यावर पुन्हा एकदा संशयाचे ढग दाटले आहे.