
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा काढला आहे. हा मोर्चा आज गुरुवारी (ता. 28 ऑगस्ट) संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहे.
खरं तर जरांगे शुक्रवारपासून (ता. 29 ऑगस्ट) आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनाला बसणार होते. पण त्यांच्या या आंदोलनाला केवळ शुक्रवारीच परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मनोज जरांगेंचा हा मोर्चा मुंबईत पोहोचण्याआधी भाजपाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली असून जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला या बॅनरच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील हे मुंबईला निघाल्यानंतर त्यांचा पहिला मुक्काम पारनेरमध्ये केला. या ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यामुळे आज त्यांचा मोर्चा मुंबईत पोहोचणार आहे. पण त्यांचा हा मोर्चा मुंबईत पोहोचण्याआधी भाजपाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील या भाजपाच्या नेत्यांनी ही बॅनरबाजी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर, उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, असेही भाजपाकडून या बॅनरच्या माध्यमातून आवर्जून सांगण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच महामार्गावरील पुलांवर भाजपाने हे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. तसेच या बॅनरवर लिहिण्यात आले आहे की, “इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो… मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे, उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस.” असे या बॅनरवर स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे. तसेच, या बॅनरच्या खाली प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील या भाजपाच्या नेत्यांनी नावे लिहिण्यात आली आहेत. त्यामुळे आता जेव्हा मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईत पोहोचेल, तेव्हा त्यांच्याकडून या बॅनरसंदर्भात नेमके काय उत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.