
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. हा मोर्चा आज गुरुवारी (ता. 28 ऑगस्ट) संध्याकाळी मुंबईत पोहोचणार आहे.
पण सध्या हा मोर्चा पुण्यात असून या ठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. पण या मोर्चामध्ये दुर्दैवी घटना घडली असून या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगेंनी या घटनेसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे. मुंबईच्या दिशेने निघालेल्या जरांगेंनी त्यांच्यासोबत असणाऱ्या आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेल्या मराठा आंदोलक सतीश देशमुख यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली.
मराठा आंदोलक सतीश देशमुख यांचा जुन्नरजवळ हार्ट अटॅकने मृत्यू झाला. याबाबत मनोज जरांगे यांनी दुःख व्यक्त करत म्हटले की, मला आता माहिती मिळाली की, आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. मी याबाबत अजूनही माहिती घेत आहे. परंतु ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. तुम्ही आता जर का आम्हाला आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत. आमचे आणखी दोन बळी घेतले आहेत. लातूरला परवाच्या दिवशी अशीच घटना घडली आहे. आज देखील अशीच घटना घडली आहे, असे म्हणत जरागेंनी मराठा समाजातील लोकांच्या मृत्यूला थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनाच जबाबदार धरले आहे.
मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे हे शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. या ठिकाणाहून त्यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले होते की, मी समाजासाठी गोळ्या झेलायला तयार आहे. सरकार मराठाविरोधी आणि हिंदूविरोधी कारवाया करत आहे. मी आझाद मैदानात उपोषण आंदोलन करणार आहे. आज माझ्यासोबत आलेले सर्व आंदोलक हे मला आझाद मैदानात सोडून परत आपापल्या गावी जाणार आहेत. त्यांना सगळ्यांना आझाद मैदानापर्यंत येऊ द्यावे, ही सरकारकडे विनंती आहे. दुसरी विनंती आहे की, आरक्षण देऊन मराठ्यांचे मन जिंकण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आली आहे. मराठी समाज हा इमानदार आहे, देणाऱ्याचे उपकार कधी विसरत नाही, मात्र अपमान करणाऱ्यांना कधी सोडत नाही, हे देखील फडणवीसांनी लक्षात ठेवावे, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे. गरीब मराठ्यांच्या हक्काचे ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, असेही ते म्हणाले.