
मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर; संविधानात्मक मार्ग…
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह आंदोलक शुक्रवारी सकाळीच मुंबईत दाखल झाले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले आहे. त्यानंतर राज्य सरकारवरील दबाव वाढत असतानाच या आंदोलनाविषयी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.
येत्या काळात मराठा आरक्षणाबाबत ओबीसी समाजाला संभाळून राज्य सरकार योग्य निर्णय घेणार आहे. मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर, संविधानात्मक मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले आहे. त्यानंतर मुंबई शहरात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्याप्रमाणे आंदोलकांनी ही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. मराठा आरक्षणाबाबत येत्या काळात कोर्टाच्या निर्देशानुसार निर्णय घेण्यात येईल. त्याबाबत आरक्षण समितीची चर्चा सुरु असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
जरांगे यांनी पोलिसांकडे आंदोलनासाठी आणखी वेळ वाढवून देण्याची परवानगी मागितली आहे. त्याबाबत कायद्याच्या चौकटीत राहून याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. त्यामधून कायदेशीर मार्ग काढण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
येत्या काळात दोन समाज एकमेकांपुढे उभे राहू नये यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मराठा समाजाला आम्हीच न्याय दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या दहा वर्षाच्या काळात महायुती सरकारने निर्णय घेतले आहेत. त्यामुळे येत्या काळात आरक्षणाबाबत कायद्याच्या चौकटीत राहून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ओबीसी-मराठ्यांमध्ये भांडणे लावू नका
दोन समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत, अशी आपली इच्छा आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये, या काळातच मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम आम्हीच केले आहे. या समाजात उद्योगासाठी मदत केली आहे. शिक्षण आणि रोजगाराच्या योजना राबवल्या आहेत. मराठा समाजासाठी आम्ही सकारात्मक आहोत. त्या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत, विरोधकांनी ओबीसी-मराठ्यांमध्ये भांडणे लावू नयेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.