
आयुक्तांना सुट्टी देणार नाही म्हणताच बीएमसीकडून प्रसाधनगृहांची उभारणी थेट फोटो शेअर; आझाद मैदानात खडी टाकली…
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातील झालेल्या गैरसोयीवरून थेट मुंबई महापालिका आयुक्तांना गर्भित इशारा दिल्यानंतर महापालिकेची पळापळ सुरू झाली आहे.
जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता मुंबई महापालिकेकडून आझाद मैदान परिसरामध्ये पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सुट्टी देणार नाही म्हणताच बीएमसीकडून आझाद मैदान परिसरामध्ये प्रसाधनगृहांची उभारणी केल्याचे फोटो शेअर करण्यात आले. दरम्यान, काल मैदान परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे सर्वत्र चिखल पसरला होता. त्यामुळे लाल चिखलामध्येच आंदोलकांना बसण्याची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानामध्ये खडी सुद्धा पसरण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
आरोपांना बीएमसी प्रशासनाकडून खोडून काढण्याचा प्रयत्न
इतकेच नव्हे तर जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांना बीएमसी प्रशासनाकडून खोडून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सुद्धा दिसून येत आहे. आझाद मैदानामध्ये लाईटची सुद्धा उभारणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यासोबत चार वैद्यकीय पथक त्याचबरोबर रुग्णवाहिका सुद्धा मैदानामध्ये तैनात करण्यात आली आहे. चिखल झालेल्या परिसरामध्ये जवळपास दोन टन खडी पसरण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता बीएमसी प्रशासन खडबडून जागा झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.
मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना इशारा
मला जरांगे पाटील म्हणाले की, बीएमसी आणि सीएसएमटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे की, शांततेने घ्या. तुम्हाला जेवायला मिळाले नाही. मुख्यमंत्री तुम्हाला पाणी मिळू देत नाहीत. कारण सध्या प्रशासक आहे. त्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा आहे. पण कधी ना कधीतरी वेळ बदलेल. तुम्ही सेवानिवृत्त जरी झाले तरी आयुक्त साहेब तुम्हाला सुट्टी देणार नाही. कारण तुम्ही मराठ्यांच्या पोरांचा पाणी बंद केलं. चांगल्या चांगल्यांची जिरली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना कधी बदल होत असतो. त्यावेळेला सगळा हिशोब होणार आहे. त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा. बीएमसीचा आयुक्त कोण आहे? असे म्हणत त्यांनी बीएमसी आयुक्तांना थेट इशारा दिला आहे.
आंदोलक माणसं आहेत, याचा सरकारला विसर पडलाय का?
दरम्यान, सोयीसुविधा ब्लाॅक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर रोहित पवार यांनीही हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजत आहे. खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स देखील बंद ठेवण्याचे अलिखित आदेश आहेत. शांतेतेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडला की काय? सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही. सरकारने त्वरित मूलभूत सुविधा द्याव्यात आणि आंदोलकांशी संवाद सुरू ठेवावा. संवाद ठेवल्यास संवेदनशीलता आणि सामंजस्य दाखवण्यास आंदोलक देखील सकारात्मक प्रतिसाद देतील आणि तोडगा निघेल.