
मराठा समाजाच्या नावावर भाजपमध्ये राजकीय आयुष्य जगणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी केला आहे. यापुढे मराठा समाजाबाबत वक्तव्य केल्यास शाई फासण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जरांगे यांच्या आंदोलनाबाबत कसा यशस्वीरित्या मार्ग काढता येईल, याचा अभ्यास करायचा सोडून, समाजामध्ये आणि इतर घटकांमध्ये परस्पर गैरसमज निर्माण होतील, अशी वक्तव्ये करून चंद्रकांत पाटील हे बालिश असल्याचे दाखवत आहेत. मराठा आंदोलनाबाबत कोणतीही बेताल वक्तव्ये न करता त्यांनी भान ठेवावे. कुठलेही वक्तव्य करताना जबाबदारीने बोलावे, अन्यथा जिल्ह्यामध्ये फिरताना चंद्रकांत पाटील यांना तोंडावर परत शाई लावावी लागेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वांचा रोष तयार होत असताना, स्वतःच्या अंगावर घेऊन आपण किती स्वामीनिष्ठ आहोत, हे दाखविण्यापलीकडे दुसरा कुठला उद्योग दिसत नाही. हा उद्योग आपल्या अंगलट येईल, याची खातरजमा करूनच आपण आपली भूमिका घ्यावी. बैठकीमध्ये मुंबईत असणार्या आंदोलकांना काय मदत पाठवायची, याबाबत चर्चा करण्यात आली. खाण्यासाठी लोकांना लागणार्या वस्तू किंवा अन्य गरजेच्या वस्तू पाठविण्याचे नियोजन ठरले. समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी सतीश साखळकर, शंभुराज काटकर, शिवाजी मोहिते, रूपेश मोकाशी, धनंजय वाघ, गजानन साळुंखे, सचिन देसाई, आनंद देसाई आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबईत सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर समाजमाध्यमातून जोरदार टीका होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी सांगलीच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली जात आहे.