
भारत आणि अमेरिकेतील संबंध गेल्या काही काळापासून बिघडलेले आहेत. भारतावर 50 टक्के कर लावल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. अशातच आता भारताने अमेरिकेला आणखी एक दणका दिला आहे.
आपली अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने अमेरिकेच्या ट्रेझरी बाँड्समधील गुंतवणूक घटवली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये भारताने अमेरिकन ट्रेझरीमध्ये 242 अब्ज डॉलर्स म्हणजेच (21 लाख कोटी रुपये) गुंतवले होते. मात्र आता हा आकडा घटला आहे. आतापर्यंत 227 अब्ज डॉलर्स (20 लाख कोटी रुपये) गुंतवले आहेत. यामुळे आता अमेरिकेला धक्का बसला आहे.
भारताने सोन्यात गुंतवणूक वाढवली
भारताने अमेरिकेच्या ट्रेझरी बिलांमधील गुंतवणूक घटवून सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे. बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी म्हटले की भारताची सोन्यात गुंतवणूक वाढली आहे. तसेच भारताने इतर परकीय चलन मालमत्तांमध्येही गुंतवणूक वाढवली आहे. यामुळेच भारत, चीन आणि ब्राझील सारख्या देशांच्या चलनात चढ-उतार दिसून आले आहेत. गेल्या एका वर्षात आरबीआयने सुमारे 39.22 मेट्रिक टन सोने खरेदी केले आहे. 27 जून 2025 पर्यंत भारताकडे 879.98 मेट्रिक टन सोने होते, जे गेल्या वर्षी 840.76 मेट्रिक टन होते.
रोख रकमेचा धोका कमी झाला
आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या अर्थतज्ज्ञ गौरा सेनगुप्ता यांनी याबाबत सागितले की, यूएस ट्रेझरी बाँड्स च्या उत्पन्नात घट झाली आहे. भारताच्या होल्डिंगमध्येही 14.5 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. भारताने आपल्या परकीय गुंतवणूकीत आता वेगवेगळे घटक सामाविष्ट करायला सुरुवात केली आहे. यामुळे अमेरिकेच्या ट्रेझरीमध्ये होऊ शकणारा संभाव्य धोका कमी झाला आहे. मात्र यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.
चीनचीही गुंतवणूक घटली
दरम्यान, जपान आणि ब्रिटनची अमेरिकन ट्रेझरी बाँड्समध्ये सर्वात जास्त गुंतवणूक आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे. मात्र चीनही आता आपली गुंतवणूक कमी करत आहे. जून 2024 मध्ये चीनची गुंतवणूक 780 अब्ज डॉलर्स होती, ही रक्कम जून 2025 मध्ये 756 अब्ज डॉलर्सपर्यंत कमी झाली आहे. मात्र इतर देश गुंतवणूक कमी करत असताना इस्रायलने मात्र ट्रेझरी बाँड्समध्ये गुंतवणूक वाढवली आहे.