
मराठा आंदोलकांना मुंबई उच्च न्यायालयाने फोर्ट परिसरातील रस्ते खाली करण्याचा आदेश दिला आहे. शिवाय आंदोलनाच्या परवानगीवरूनही आणि आंदोलकांच्या वागणुकीवरून नाराजी व्यक्त केली आहे.
यावरून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलककांनी उपदेशाच्या चार गोष्टी सुनावल्या आहेत. तसेच गोंधळ घालायचा असेल तर निघून जा, असेही सुनावले आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्या आवाहनाला मराठा आंदोलक कसा प्रतिसाद देतील हे दोन दिवसांत स्पष्ट होईल.
मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मात्र, हजारोंच्या संख्येने आलेले मराठा आंदोलक आणि काहींच्या वागण्यामुळे सुरू झालेला उपद्रव लक्षात घेऊन एमी फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज (1 सप्टेंबर) सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाने आंदोलकांना झापले तसेच आंदोलन विनापरवानगी असल्याचे स्पष्ट केले. शिवाय 2 सप्टेंबरला दुपारी आंदोलकांनी दक्षिण मुंबई परिसरातील रस्ते खाली करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशानंतर बेमुदत उपोषणाला बसलेले आणि आजपासून निर्जळी सुरू केलेल्या जरांगे पाटील यांनी आंदोलकांना कानपिचक्या दिल्या.
मला घोट घोट पाणी पिऊन तुमच्याशी बोलावं लागत आहे, मग तुमचा उपयोग काय? असा सवाल जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केला. आता तुमच्या गाड्या मैदानात लावा आणि मैदानाच झोपा. मुंबईकरांना त्रास होईल, असं कुणी वागू नका, अशी सक्त ताकीद जरांगे पाटील यांनी आंदोलकांना दिली. तसेच कुणाचं ऐकून गोंधळ करायचा असेल तर निघून जा, असेही जरांगे यांनी सुनावले. त्याचवेळी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची सूचनाही त्यांनी केल्या.
काही आंदोलक धुडगूस घालत आहेत, महिला पत्रकारांना त्रास देत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यावर जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये हीच मंडळी होती. तिथं सर्व व्यवस्थित होतं. इथं त्रास दिला जातोय, पत्रकारांना त्रास दिला जातोय. त्यामुळे मला संशय येतोय. यामागे षडयंत्र असावा, असा संशय जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान,
मला उपोषणाचा त्रास होतोय. म्हणूनच सूचनांचं पालन करा आणि त्रास होणार नाही असे वागा, असे जरांगे यांनी मराठा आंदोलकांना सांगितले. त्याचवेळी मी मेलो तरी इथून उठून येणार नाही. तुमच्यासाठी मी मरायला तयार आहे, तुम्ही नियमांचे पालन करा, मराठ्यांचा गर्व वाटेल असे वागा असे आवाहन त्यांनी केले.