
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान, काल ओबीसी नेत्यांची मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात बैठक झाली.
या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको, असे म्हटले. तसेच आरक्षण दिले तर ओबीसी मुंबईत येतील, असा इशारा दिला.
छगन भुजबळांच्या या इशाऱ्यानंतर मराठा समाजाच्या काही व्हाॅट्सअपग्रुपवर भुजबळ यांचे कौतुक करत मराठा नेत्यांवर टीका करण्यात आली. भुजबळ हे मंत्री आहेत मात्र ते उघडपणे आपल्या समाजाची बाजु घेत आहेत पण उपमुख्यमंत्री असलेले मराठा अजित पवार, एकनाथ शिंदे मुगगिळून शांत असल्याची टीका करण्यात आली.
भुजबळांनाच्या मागणीला आमचा विरोध आहेच आम्ही त्यांना विरोध करत राहू पण मराठा नेत्यांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे की, आपल्या समाजाच्या मागे कशाप्रकारे उघडपणे उभे राहायचे असते, असा टोला देखील मराठा आंदोलक लगावत आहेत.
‘मनोज जरांगे पाटील आणि मुंबईतील मराठी आंदोलक यांची सातत्याने कोंडी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. अन्नपाणी आणि अन्य सुविधांबाबत कोंडी करण्याचा जाहीरपणे प्रयत्न झाला. विशेष म्हणजे अर्धा डझन मंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असताना हे सर्व झाले आहे’, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक नाना बच्छाव यांनी केला.
शिंदे, पवार गप्प का?
महायुती सरकारमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री या विषयावर गप्प आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या घरी पुण्याला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती बसवण्यासाठी आपल्या गावी गेले आहेत. राज्यभरातील हजारो आंदोलक मुंबई आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करीत असताना दोन्ही उपमुख्यमंत्री आपली तटस्थ भूमिका प्रदर्शित करीत आहेत मात्र मराठा समाजाच्या बाजुने उघडपणे बोलत नसल्याचे आरोपही मराठा समाजाच्या आंदोलकांकडून करण्यात आला आहे.
भुजबळांचा आदर्श केव्हा घेणार?
भुजबळ यांचे कौतुक करणाऱ्या व्हायरल मेसेजवर बोलताना मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक नाना बच्छाव म्हणाले, भुजबळ सहा महिन्यांपूर्वी मंत्रिपद नसल्याने आदळ आपट करत होते. आता मंत्री झाल्याबरोबर त्यांनी आपला नेहमीचा ओबीसी राग अळवला आहे. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक केले पाहिजे. कारण मनोज जरांगे पाटील आपला जीव धोक्यात घालून समाजाला आरक्षण मिळावे म्हणून निकराने आणि निर्णायक आंदोलन करीत आहेत.मात्र त्यांच्याकडून निवडणुकीत समाजाची मते घेणाऱ्या नेते आणि मंत्र्यांनी आपले तोंड बंद ठेवले आहे. यासंदर्भात भुजबळ यांची भूमिका विरोधात असली तरीही त्यांनी आपला ओबीसी बाणा सोडला नाही. मराठा समाजाचे नेते छगन भुजबळ यांचा समाजासाठी कोणाशीही संघर्ष करण्याचा आदर्श केव्हा घेतील?, असेही बच्छाव यांनी सांगितले.