
अफगाणिस्तान देशात सध्या तालिबानची सत्ता आहे. तालिबानची सत्ता आल्यापासून या देशातील अनेक नियम बदललेले आहेत. विशेष म्हणजे महिलांवर अनेक बंधनं लादण्यात आलेली आहेत.
महिलांना खुलेपणाने फिरण्याची इथे मुभा नाही. सोबतच इथे ब्युटी पार्लवरही बंदी आहे. दरम्यान, आता महिलांना एवढी सारी बंधनं असताना सध्या या देशातील बड्या अधिकाऱ्यांच्या पत्नींचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या महिलांचे फोटो सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत असून तालिबान सरकारवर गंभीर असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कादपत्रांवरून फोटो हटवण्याचे फर्मान
मिळालेल्या माहितीनुसार सध्या अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या पत्नींचे काही फोटो समोर आले आहेत. तालिबान सरकारने नुकतेच महिलांनी त्यांच्या शासकीय कागदपत्रांवरून त्यांचे फोटो हटवून टाकावेत, असे फर्मान सोडले आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही अधिकाऱ्यांच्या महिलांचे फोटो समोर आले आहेत.
9 अधिकाऱ्यांच्या पत्नींचे फोटो आले समोर
सरकारी कागदपत्रांवरील फोटो हटवण्याच्या आदेशामुळे ज्या महिला विदेशात जाऊ इच्छितात त्यांना त्यांच्या पासपोर्टवरील फोटोदेखील हटवावे लागतील. परिणामी त्यांना परदेशात जाणे कठीण होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन जगभरातून तालिबान सारकारच्या या निर्णयाला कठोर विरोध केला जता आहे. याच विरोधाचा भाग म्हणून सध्या 9 मोठ्या अधिकाऱ्यांच्या पत्नींचे फोटो समोर आले आहेत. हे फोटो पोस्ट करून सरकारचा आदेश फक्त गरीब आणि सामान्य महिलांसाठीच आहे का? तो अधिकाऱ्यांच्या पत्नींसाठी नाही का? असा सवाल विचारला जात आहे. व्हायरल होत असलेले फोटो हे अधिकाऱ्यांच्या पत्नींचे पासपोर्टवरील फोटो आहेत.
उपस्थित केले जात आहेत गंभीर प्रश्न
अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएच्या माजी गुप्तहेर सारा एडम्स यांनी हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सारा यांच्या दाव्यानुसार एकूण 9 अधिकाऱ्यांच्या पत्नींचे फोटो त्यांच्या पासपोर्टवर आहेत. त्यामुळे तालिबानचे नियम हे समान्यांनाच आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये कसमत बिवी (पेशावरमधील राजनयिकाची पत्नी), नजिबा सलीम (इराणमधील अफगाणीच्या राजदूताची पत्नी), फरीदा अमीन (बेसिकमध्ये असलेल्या अधिकाऱ्याची पत्नी) यांचा समावेश आहे. सारा यांनी पुराव्यानिशी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे तालिबान सरकारवर टीका होत आहे. नुकतेच तालिबानचे राष्ट्रपती अखंजदा यांनी एक आदेश काढून महिलांनी कागदपत्रावरील फोटो हटवण्याच्या आदेशाचे पालन करावे, असे सांगितले होते.
दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये नेहमीच शिक्षण, महिलांचे हक्क या मुद्द्यांवरून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येतात. याच कारणामुळे अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामीद करजई हे तालिबानच्या रडारवर असतात. नुकतेच तालिबानी सरकराने करजई यांना देश सोडून जाण्याचे फर्मान सोडले होते. 2021 साली तालिबानने अफगाणिस्तानातील सरकार पाडून संपूर्ण देशावर नियंत्रण मिळवले होते.