
भुजबळांचं आता सरकारलाच आव्हान म्हणाले; असंं आरक्षणच…
राज्यातील फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या अखेर मान्य केल्या आहेत. सरकारमधील मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतचा जीआरही आला आहे. पण आता सरकारच्या या निर्णयावरुन उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
महायुती सरकारच्या हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयावर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंगळवारी (ता.2) आपली प्रतिक्रिया देतानाच खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी थेट मराठा आणि कुणबी वेगळे, असं आरक्षण देताच येत नसल्याचं विधान करत केलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयानं मराठा व कुणबी हे दोन समाज वेगळे आहे, या वेगळ्या जाती आहेत, असं म्हटलं आहे. या दोन्ही जातींना एकत्र मानणं हे सामाजिक मूर्खपणा असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही हे दोन्ही कधीही एकत्र येऊ शकत नाही, असं सांगितलं आहे.
देशात 1993 नंतर आयोग ही संकल्पना रुजू झाल्यानंतर तुम्हाला यासाठी आयोगाकडे जावं लागतं. त्यामुळे कुठलाही मुख्यमंत्री आणि मंत्री असं आरक्षण देऊ शकत नाही, असं स्पष्ट मतही भुजबळ यांनी व्यक्त केलं.
मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारनं घेतलेल्या निर्णयावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही चांगलाच संताप व्यक्त केल्याचं दिसून आलं. ते म्हणाले, सरकारचा हा जीआर संविधान विरोधी आहे. ओबीसी समाजाचं आरक्षण संपवणारा हा निर्णय आहे. या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण आज संपुष्टात आल्याचा आरोपही हाके यांनी यावेळी केला.
तसेच ओबीसींनो जर तुम्ही एकजूट झाला नाहीत, तर येथून पुढच्या काळात गावच्या चावडीवर येऊन गप्पा मारण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार राहणार नाही. पुन्हा गुलामगिरीत जा आणि पुन्हा जी हुजूर म्हणा, असा उपरोधिक टोलाही हाके यांनी यावेळी लगावला.
हाके म्हणाले, गावगाड्यात ओबीसींनो तुम्ही दुय्यम आहात, मागास आहात. सरपंच होण्याचा तुमचा मार्ग संपलेला आहे. सरकारनं संविधान विरोधी निर्णय घेतलाय. उद्या गावातून आपल्याला हुसकावून लावलं जाईल. पण आज सरकार हतबल होतं, हतबलते पुढे ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेण्याचं कामं या सरकारनं केल्याची टीकाही त्यांनी केली. या जीआरला स्टे लावणं, PIL दाखलं करणं गरजेचं आहे. आम्ही न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचा इशाराही यावेळी लक्ष्मण हाके यांनी दिला.