
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी यशस्वी मध्यस्थी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सुरू केलेले आंदोलन ना. सामंत यांच्या एका भेटीनंतर मागे घेण्याचे आश्वासन दिले. यामुळे मराठा समाजाच्या आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांनी उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर, सरकारमधील अनेक मंत्री आणि नेत्यांनी जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश येत नव्हते. अखेर, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, सामंत यांनी सरकारची बाजू आणि पुढील कार्यवाहीची योजना समजावून सांगितली. ना. सामंत यांनी केलेल्या विनंतीला मान देत जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन मागे घेण्याचे आश्वासन दिले. या यशस्वी शिष्टाईमुळे मराठा समाजात समाधानाचे वातावरण पसरले आहे. यावेळी, आंदोलकांनी उदय सामंत यांच्या भूमिकेची प्रशंसा केली आणि त्यांचे आभार मानले. एकाच भेटीत यशस्वी तोडगा काढल्यामुळे ना. सामंत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.