
भारताच्या शेजारचा छोटासा देश नेपाळ मागच्या तीन दिवसांपासून हिंसाचारामध्ये होरपळत आहे. सोशल मिडिया बॅनवरुन सुरु झालेल्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं. अवघ्या दोन दिवसात के.पी. शर्मा ओली यांचं सरकार कोसळलं.
जेन-Z समर्थकांनी केलेल्या आंदोलनात नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. नेते, मंत्र्यांना पळवून पळवून मारण्यात आलं. हा राग आणि चिडीमागे मुख्य कारण होतं, नेपाळमधला भ्रष्टाचार आणि बेरोजगारी. नेपाळमध्ये सत्तापालट झाल्यानंतर नवीन पंतप्रधान कोण बनणार? यावर विविध तर्क-वितर्क सुरु होते. अखेर आता एका नावावर शिक्कामोर्तब झालय. नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनणार आहेत. राष्ट्रपती रामचन्द्र पौडेल त्यांना शपथ देतील. जेन-Z समर्थकांमध्ये त्यांच्या नावावर एकमत झालं.काठमांडूचे महापौर आणि PM पदाचे प्रबळ दावेदार बालेन शाह यांनी सुद्धा कार्की यांचं समर्थन केलय. अंतरिम पंतप्रधानपदासाठी कुलमान घिसिंग यांचं नाव सुद्धा शर्यतीत होतं. घिसिंग यांनी नेपाळ वीज बोर्डात काम केलय.
सुशीला कार्की हा मागच्या अनेक वर्षांपासून नेपाळमध्ये सरकार विरोधी चेहरा राहिला आहे. मुख्य न्यायाधीश पदावर असताना त्यांनी नेपाळ सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात अनेक निर्णय घेतले होते. या आपल्या निर्णयांमुळे त्या नेपाळच्या Gen Z मध्ये लोकप्रिय बनल्या. 73 वर्षांच्या सुशीला या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश राहिल्या आहेत. त्यांचा जन्म 7 जून 1952 रोजी नेपाळच्या बिराटनगरमध्ये झाला. 11 जुलै 2016 रोजी त्या नेपाळ सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस बनल्या. कार्की या पदावर जवळपास 1 वर्ष होत्या. त्यानंतर 30 एप्रिल 2017 रोजी त्यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणला. त्यानंतर त्यांना चीफ जस्टिस पदावरुन सस्पेंड करण्यात आलं.
भारतात कुठे घेतलं शिक्षण?
1972 साली त्यांनी महेंद्र मोरांग कॅम्पस बिराटनगरमधून BA केलं. त्यानंतर 1975 साली भारताच्या बनारस हिंदू यूनिवर्सिटीमधून पॉलिटिकल सायन्समधून मास्टर्स केलं. त्यानंतर 1978 साली नेपाळच्या त्रिभुवन यूनिवर्सिटीमधून कायद्याची पदवी घेतली.त्यानंतर त्यांनी लॉ ची प्रॅक्टिस सुरु केली.
भारताबद्दल त्यांचं काय मत?
सुशीला कार्की या भारत-नेपाळ संबंधांबद्दल सकारात्मक आहेत.त्या इंटरव्यूमध्ये म्हणालेल्या की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करते. PM मोदीबद्दल त्यांचं चांगलं मत आहे. “आम्ही अनेक दिवसांपासून भारताच्या संपर्कात नाही आहोत. आम्ही या बद्दल बोलू. जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय विषय असतो, दोन देशांमधलं प्रकरण असतं. तेव्हा काही लोक बसून निती बनवतात” असं सुशीला कार्की म्हणाल्या.