
धनंजय मुंडेंच्या त्या वक्तव्यावर जरांगे पाटलांचा खोचक टोला !
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, या प्रकरणानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. दरम्यान या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव आलं, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जात असल्यानं, धनंजय मुंडे यांच्या देखील अडचणीत वाढ झाली, विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती, अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या तब्येतीचं कारण पुढे करत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मात्र आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचे वेध लागल्याचं दिसून येत आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा रायगडमध्ये जाहीर सत्कार सोहळा पार पडला, या कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांच्याकडे मोठी मागणी केली, ‘माझ्या हाताला आता काहीतरी काम द्या. कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका. आम्हाला जबाबदारी द्या,’ असं मुंडे यांनी म्हटलं आहे. मुंडे यांच्या या मागणीमुळे आता चर्चेला उधाण आलं असून, त्यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
धनंजय मुंडे यांच्या या मागणीवर जरांगे पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे. धनंजय मुंडे यांचे हात रिकामे आहेत, त्यांना रोजगार हमीचं काम द्या, त्यांना बराशी खोदायला पाठवा असं मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे यांना म्हटलं आहे. दरम्यान मराठ्यांच्या नादाला लागू नका, अन्यथा अजितदादांना पण सोडणार नाही, त्यांचाही कार्यक्रम लावणार असा इशाराही यावेळी जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ओबीसी आंदोलनाच्या लढ्यात यावं अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती, त्यावरून देखील जरांगे पाटील यांनी निशाणा साधला आहे. ते सर्वांना आसेच कामाला लावतात, मग अलीबाबाला खेळायला मैदान मोकळं राहातं, ते लोकांकडून फुकटात काम करून घेतात असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.