
शिर्डी नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरलं आहे. विशेष करून, माजी खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत.
एका समर्थकाने थेट शिर्डीच्या वेशीवर सुजय विखे पाटील यांच्याविरोधात बॅनरबाजी केली आहे. “शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला दादांनी मारलं, आई ,दादाचं वाक्य खरं ठरलं”, अशा आशयाच्या बॅनरबाजीमुळे शिर्डीतील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
शिर्डीचे(Shirdi)नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चार वर्षांपासून अनेक जण प्रतीक्षेत होते. त्यासाठी फिल्डिंग देखील लावली होती. विखे पाटलांच्या समर्थकांमध्ये चढाओढ लागली होती. यासाठी विखे पाटल्यांच्या ‘गुडबुक’मध्ये जाण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. परंतु नगराध्यक्षपदाचं आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने अनेकांच्या स्वप्न धुळीस मिळाले. याची आता आगपाखड करण्यास सुरूवात झाली आहे. यातून समर्थकांनीच विखे पाटील यांना टार्गेट केलं आहे.
शिर्डीचे माजी नगराध्यक्ष तथा विखे पाटलांचे कट्टर समर्थक कैलासबापू कोते यांनी शिर्डीच्या शिवेवर बॅनरबाजी केली आहे. “शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला दादांनी मारलं, आई, दादाचं वाक्य खरं ठरलं”, अशा आशयाची बॅनरबाजी केली. त्यामुळे शिर्डीतील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ऐन समर्थकच विखे पाटलांविरोधात गेल्याने आगामी राजकारण वेगळ्याच पातळीवर धुरळा उडवणारे ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, शिर्डीतील नगराध्यक्षपदासाठीची स्पर्धा पाहून, सुजय विखे पाटील यांची डोकेदुखी वाढली होती. यावर ते शिर्डीतील छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमधून थेट भाष्य करायचे. यातच त्यांनी, साईबाबा नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित महिलांसाठी निघू दे, मी लोणी ते शिर्डी पायी वारी करीन, असे म्हटले होते. योगायोग असा की, त्यांची प्रार्थना फळाला आली. नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले. विखे पाटील यांच्या या विधानाचे जुने व्हिडिओ आता समोर आणले जाऊ लागले आहे. यामुळे इच्छुकांची धावपळ थंडावली.
विखे पाटलांचे नाराज झालेले कट्टर समर्थक, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी सोशल मीडियावर वरची खोचक पोस्ट शेअर केली. ‘…आई दादांच खरं ठरलं, आता दादांच्या नियोजित लोणी-शिर्डी पदयात्रेस शुभेच्छा!’, असे म्हणत कैलासबापू कोते यांनी विखे पाटलांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
समर्थकांच्या या नाराजीनंतर सुजय विखे पाटील काल सायंकाळी शिर्डीत एका कार्यक्रमाला आले होते. तत्पूर्वीच शिर्डीच्या वेशीवर विखे पाटील समर्थकांनी विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरबाजीची सुजय विखे पाटील यांनी दखल घेत, तिचा उल्लेख केला. तसंच शिर्डीतील स्थानिक राजकारणावर भाष्य केलं. “उपरवाले की लाठी मे आवाज नहीं रहती, बापूंची संधी हुकल्याचे मलाही वाईट वाटलं, मी त्यांनाच तिकीट देणार होतो, पण आता काय करू शकतो?, अशा शब्दात विखे पाटील यांनी समर्थकाच्या बॅनरबाजीवर भाष्य केलं.