
पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र !
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प अफगाणिस्तानला धमकी देत आहेत. या धमकीविरोधात आता भारततालिबानसोबत उभा राहिला आहे. अफगाणिस्तानवरून जागतिक राजकारण बदललं आहे. भारतानेतालिबान, पाकिस्तान, चीन आणि रशियासोबत मिळून अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागणीचा विरोध केला आहे.
अफगाणिस्तानमधील बगराम एअरबेस अमेरिकेला सुपूर्द करावे असं ट्रम्प यांनी म्हटलं होते. तालिबानी परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यातच अमेरिकेनं ही मागणी केली आहे.
मॉस्कोने आयोजित केलेल्या मॉस्को फॉर्मेट कंसल्टेशन ऑन अफगाणिस्तानच्या सातव्या बैठकीत भारत, इराण, कजाकिस्तान, चीन, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान आणि किर्गीस्तानसह १० देशांनी सहभाग घेतला होता. बेलारूसचे प्रतिनिधी या बैठकीला पाहुणे म्हणून उपस्थित होते. बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात कुठल्याही एका देशाचं नाव न घेता सांगण्यात आले की, अफगाणिस्तानात अथवा त्याच्या शेजारील कुठल्याही देशात अन्य देशाच्या सैन्य तैनातीवर सहभागी सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. हे प्रादेशिक शांतता आणि स्थिरता याविरोधात असेल. हे विधान थेटपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागणीविरोधात करण्यात आले आहे.
ट्रम्प अन् तालिबान भिडले
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच तालिबानने अमेरिकेला बगराम एअरबेस परत द्यायला हवे अशी मागणी केली. हा तोच एअरबेस आहे, जिथून अमेरिकेने २००१ नंतर वॉर ऑन टेरर म्हणजेच दहशतवादाविरोधात युद्ध अभियान चालवले होते. १८ सप्टेंबरला ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी आम्ही हा एअरबेस तालिबानला मोफत दिला होता, आता तो आम्हाला परत हवाय असं म्हटले होते. जर अफगाणिस्तान बगराम एअरबेस परत देणार नसेल तर त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकीही ट्रम्प यांनी दिली होती. त्यावर तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी ट्रम्प यांची मागणी फेटाळली. अफगाणिस्तान कुठल्याही परिस्थितीत आमची जमीन दुसऱ्याला देणार नाही. त्यासाठी आम्ही पुढील २० वर्ष युद्ध लढण्यासाठी तयार आहोत असं पलटवार केला होता.
भारतानं दिली तालिबानला साथ
अमेरिकेच्या धमकीनंतर भारत तालिबानसोबत उभा राहिला आहे. मुत्ताकी पहिल्यांदा भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्यांना ९ ते १६ ऑक्टोबरपर्यंत दौऱ्याची परवानगी दिली होती. मुत्ताकीचा समावेश UNSC च्या बंदी यादीत आहे, त्यामुळे त्यांना विशेष मान्यता मिळाली आहे.
अमेरिकेला बगराम एअरबेस का हवा?
काबुलपासून जवळपास ५० किमी अंतरावर असणारा बगराम एअरबेस अफगाणिस्तानातील सर्वात मोठं विमानतळ मानले जाते. याठिकाणी २ रनवे आहेत. ज्यातील एक ३.६ किमी तर दुसरे ३ किमी लांबीचे आहे. डोंगराळ भागामुळे अफगाणिस्तानात मोठ्या विमानांना लँडिंग करण्यात अडचणी येतात त्यामुळे बगराम एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते.