
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (08 ऑक्टोबर) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भुमीपूत्रांनी लढा उभारला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव पुढील तीन महिन्यात देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र बुधवारी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबद्दल कोणतेच आश्वासन देण्यात आलेले नाही. पंतप्रधान मोदींनी दिबांचा गौरवपूर्ण उल्लेख मात्र त्यांच्याकडून कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळाला स्वतःचे नाव देणार आहेत, असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या गोवा विमानतळाच्या भाषणातच गोवा विमानतळसाठी दिवंगत मनोहर पर्रिकर यांचं नाव दिलं होतं आणि तो अतिशय योग्य निर्णय होता. एवढी ताकद पंतप्रधान मोदींकडे असते, परंतु काल नवी मुंबईच्या विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत कसलाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला नाही, याचं आश्चर्य वाटतं.
रोहित पवार यांनी दावा करताना म्हटले की, संघाची शताब्दी असल्याने विमानतळाला संघाशी संबंधित नेत्याचं नाव देण्याचा भाजपा व संघाचा मानस आहे. कारण उद्घाटन समारंभ उजाडला तरी दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय प्रलंबित ठेवला गेल्याचं जाणकारांकडून सांगितलं जातंय. पण भाजपाने कितीही जोर लावला तरी स्थानिक भूमिपुत्र भाजपाचा हा डाव उलथून टाकतील, यात कुठलीही शंका नाही, असा इशारा रोहित पवार यांनी केला.