
शेवटची ओळ अन् राज ठाकरेंनी दादांना का डिवचलं ?
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांचा घोटाळा, मतदान पद्धती या सगळ्याबाबत राज्यातील विरोधी पक्षांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी निवडणूक आयोगासमोर मांडल्या.
याच सगळ्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थोड्या वेळापूर्वीच एका फेसबुक पोस्ट शेअर करून निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पण याचवेळी पोस्टच्या शेवटच्या ओळीतून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना डिवचलं आहे.
राज ठाकरेंनी शेवटच्या ओळीतून कसा काढला अजितदादांना चिमटा?
‘निवडणूक यादीत घोळ आहेत, ते घोळ आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठेवलेले आहेत. त्यावर निवडणूक आयोगाने कार्यवाही करून घोळ सोडवावेत इतकीच आमची इच्छा आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या तरीही महाराष्ट्रात शांतता होती. कोणीही जल्लोष केला नाही हे कसलं द्योतक आहे? २०१९ साली याच विषयावर मी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळीही राज्यातील सर्व विरोधी पक्षांचे नेते पत्रकार परिषदेत सहभागी होते. त्यावेळी अजित पवारही तिथे उपस्थित होते. त्यांनीही आज यायला हवं होतं.
निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी…
मागच्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक निवडणुकांपासूनच, राज्य निवडणूक आयोगाच्या पारदर्शीतेबद्दल लोकांच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या मनावर शंकेचं सावट आहे.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका यातरी किमान पारदर्शी व्हाव्यात आणि निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे हे दिसलंच पाहिजे. पण आत्ता निवडणूक आयोगाच्या कारभारात काही त्रुटी आहेत…
या त्रुटी दूर व्हायलाच पाहिजेत… त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पारदर्शी व्हायला पाहिजेत असं वाटणाऱ्या सगळ्या नेत्यांचं शिष्टमंडळ गेले २ दिवस निवडणूक आयोगाला भेटत होतो. आम्ही आमचं आणि जनतेचं म्हणणं निवडणूक आयोगासमोर मांडलं. त्यानंतर आम्ही सर्वानी माध्यमांशी संवाद साधला. त्यातील मी मांडलेले मुद्दे…
निवडणूक आयोग केवळ निवडणूक घेतात आणि राजकीय पक्ष निवडणूका लढवतात, मग राजकीय पक्षांना जर निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत नसेल तर पहिला घोळ इथे आहे
२०२४ साली ज्या निवडणुका झाल्या त्याआधीच्या यादीत मुलांच्या वयापेक्षा वडिलांचे वय कमी कसे?
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या मतदारयादीत अनेक मतदारांची नावं आहेत मात्र फोटो नाहीत.
राज्य निवडणूक आयेगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगावर ढकलली
जोपर्यंत मतदार याद्यांमध्ये पूर्णपणे सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका अशी मागणी आम्ही निवडणुक आयोगाकडे केली आहे. त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतं ते पाहू आणि आम्ही पुढचा निर्णय घेऊ
जेव्हा खोट्या यादीची बातमी माध्यमांवर येते नंतर संबंधित नावं मतदार यादीतून गायब होतात त्याबद्दल निवडणूक आयोगाला माहिती नाही. जी नावं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून गायब झाली त्याची माहिती आयोगाकडे नसेल तर ती नावं कोण काढतंय आणि नवी नावं कोण टाकतंय याचा तपास करावा लागेल
आपण कोणाला मतदान करतो हे गोपनिय असतं… मतदार कसे गोपनीय असतील? मतदान केंद्रावर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज निवडणूक आयोग बघू शकतं मग आम्ही का नाही बघू शकत?
या सगळ्या गोष्टींमध्ये निवडणूक आयोग लपाछपी का करतंय हेच मला कळत नाहीये.
२०२२च्या यादीत जाहीर केलेल्या यादीमध्ये मतदारांचे फोटो आहेत, मग आत्ता जाहीर केलेल्या यादीतून मतदारांचे फोटो का काढून टाकले? हा घोळ निवडणूक आयोग का करतंय?
या देशातील ही पहिली निवडणूक नाही, याआधीच्या कोणत्याही निवडणूकीच्या वेळेस असे मुद्दे आले नाहीत मग, हे या निवडणूकीच्या वेळीच का आले?
निवडणूक यादीत घोळ आहेत, ते घोळ आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठेवलेले आहेत. त्यावर निवडणूक आयोगाने कार्यवाही करून घोळ सोडवावेत इतकीच आमची इच्छा आहे.
या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या तरीही महाराष्ट्रात शांतता होती. कोणीही जल्लोष केला
नाही हे कसलं द्योतक आहे?
२०१९ साली याच विषयावर मी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळीही राज्यातील सर्व विरोधी पक्षांचे नेते पत्रकार परिषदेत सहभागी होते. त्यावेळी अजित पवारही तिथे उपस्थित होते. त्यांनीही आज यायला हवं होतं.
अशा स्वरूपाची पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. आता या सगळ्याबाबत निवडणूक आयोग का निर्णय घेतं आणि त्यानंतर विरोध पक्ष कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.