
त्यांनी मला भाग पाडलं !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चीनी मालावर १०० टक्के टॅरिफ लावण्याच्या प्रस्तावाबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की, चिनी वस्तूंवर १०० टक्के टॅरिफ लावण्याचा त्यांचा प्रस्ताव हा काही कायमस्वरूपी राहणार नाही. इतकेच नाही तर, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आगामी भेटीपूर्वी बीजिंगवर दबाव टाकण्यासाठी करण्यात आलेला एक कठोर उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“हे (चीनवरील टॅरिफ) काही कायमस्वरूपी नाही, पण तोच नंबर आहे,” असे ट्रम्प फॉक्स बिझनेस नेटवर्कशी बोलताना म्हणाले. “त्यांनी मला हे करण्यास भाग पाडले,” असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांनी पुढे बोलताना ते दोन आठवड्यांत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत आणि या चर्चेबद्दल ते आशावादी आहेत असेही यावेळी सांगितले. “चीनबरोबर गोष्टी व्यवस्थित होतील,” असा त्यांना विश्वास असल्याचेही पुढे ट्रम्प म्हणाले.
१० ऑक्टोबर रोजी ट्रम्प यांनी अमेरिका चिनी मालावर १०० टक्के टॅरिफ लागू करेल आणि हे १ नोव्हेंबरपासून लादले जाईल असे जाहीर केले होते.
चीनच्या या यापूर्वी कधीही न घेतलेल्या भूमिकेमुळे, अमेरिका चीनवर सध्या लाग असलेल्या शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लादेल,” अशी पोस्ट ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर लिहिली होती. तसेच ट्रम्प असेही म्हणाले होते की, अमेरिका सर्व क्रिटिकल सॉफ्टवेअरवर निर्यांत कंट्रोल लागू करेल. तसेच ट्रम्प यांनी ते शी यांच्याबरोबरची बैठक रद्द करण्याचे संकेत देखील यावेळी दिले होते.
या वर्षाच्या सुरुवातीला दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी चिनी मालावरील अमेरिकन शुल्क वाढवत १४५ टक्क्यांपर्यंत पोहचवले. तर याला प्रत्युत्तर म्हणून चीनने देखील अमेरिकन निर्यातीवरील शुल्क १२५ टक्के केले. पण दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर चिनी मालावरील अमेरिकन टॅरिफ ३० टक्क्यांपर्यंत खाली आले, तर चीनने अमेरिकन मालावर लादलेले टॅरिफ १० टक्क्यांपर्यंत खाली आले.