जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द कसा झाला ?
पुण्यात मोक्याच्या जागी असणाऱ्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गदारोळ सुरु होता. ही जागा गोखले बिल्डर्सने विकत घेतली होती.
गोखले बिल्डर्स आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर केला होता. रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरले होते. अखेर रविवारी रात्री विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हाऊसला ई-मेल पाठवून जागेचा व्यवहार रद्द झाल्याचे सांगितले. यानंतर रवींद्र धंगेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पुढील दोन दिवस मी मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल काही बोलणार नाही. येत्या दोन दिवसांत जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेचा व्यवहार रद्द करावा. एकनाथ शिंदे यांनी मला सांगितले की, दोन दिवसांत तोडगा निघेल. त्यामुळे मी आज आनंदी आहे. चंद्रकांत पाटील हे आज अमित शाह यांचा निरोप घेऊन मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आले होते. त्यामुळे आता दोन दिवसांत जैन बोर्डिंगचा पूर्ण व्यवहार रद्द झाल्यावर मी मुरलीधर मोहोळ यांच्यासह सगळ्यांना जिलेबी भरवेन, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
हा गतीमान आणि बोगस व्यवहार झाला, त्याची चर्चा संपूर्ण देशात झाली. विशाल गोखले यांनी ई-मेल पाठवला असेल तरी मला अद्याप विश्वास नाही. जोपर्यंत हा व्यवहार रद्द होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आता ट्रस्टीच पळून गेले तर त्यांना कुठून पकडून आणणार. ट्रस्टींनी हा व्यवहार केला होता. खऱ्या अर्थाने विशाल गोखले खूप पैसेवाला नाही. तो पूर्वी लहान होता. पण 10-12 वर्षांत मुरलीधर मोहोळ पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले तेव्हापासून विशाल गोखले यांची संपत्ती वाढत गेली. पण मला या विषयावर बोलायचं नाही. कारण मला शिंदे साहेबांनी सांगितले आहे की, यावर बोलायचं नाही. विशाल गोखले हा दिलेल्या भाकरीचा आणि सांगितलेल्या कामाचा आहे. विशाल गोखले खूप मोठा माणूस नाही. त्याला व्यवहार कोणी करायला सांगितला आणि नंतर कोणी काढायला लावलं यावर आपल्यलाा बोलायचे नाही. पण दोन दिवसांत हा व्यवहार कायदेशीरदृष्ट्या संपला पाहिजे. मी आता रात्रीही हा व्यवहार करणाऱ्या रजिस्ट्रारला आणू शकतो. तो कुठे राहतो, मला माहिती आहे. दोन दिवस मी गप्प बसेन हा शब्द मी एकनाथ शिंदे साहेबांना दिला आहे. ते माझे नेते आहेत. त्यांच्या मानसन्मान ठेवणं माझं काम आहे. पण मी त्यांच्याकडून शब्द घेतला आहे की, मी चुकीचं वागणार नाही. पण चुकीचं घडत असेल तर मी बोलणार, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.


