अन् तिकडं आदित्य ठाकरेंनीच उठवलं रान !
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी सातत्यानं विविध मुद्द्यांच्या आधारे भाजपच्या नेत्यांना कोंडीत पकडलं आहे. जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेच्या घोटाळ्यावर आवाज उठवल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा लोकमान्य नगर भागातील रिडेव्हलपमेंटमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार होते.
पण त्यांच्या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी हा मुद्दा उचलला आहे. जैन ट्रस्टबाबत गोखले बिल्डरने व्यवहारातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी आपण लोकमान्य नगरमधील रिडेव्हलपमेंटबाबत मोठे खुलासे करणार असल्याचं जाहीर केलं होतं. लोकमान्य नगरच्या रिडव्हलपमेंटच्या मुद्द्यावरून स्थानिक भाजपा आमदार हेमंत रासने हे चंद्रकांत पाटील हे धंगेकरांच्या निशाण्यावर होते. पण हा मुद्दा घेऊन मैदानात उतरण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी या मुद्द्याला हात घातला आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेलं महाराष्ट्रातलं सरकार अल्पावधीतच ‘बिल्डर-कंत्राटदारांचं सरकार’ झालं आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, पुण्यातल्या लोकमान्यनगरचंच उदाहरण पाहा तिथल्या पुर्नविकासाचा मार्ग स्थानिक रहिवाश्यांनी निवडला असताना आणि त्यांना तो विकास हवा असतानाही, अचानक स्थानिक आमदाराच्या पत्रावरुन थेट मुख्यमंत्री कार्यालयाने या पुर्नविकासाला स्थगिती दिली आहे. एका झटक्यात असं करण्याचं कारण काय? आता ‘क्लस्टर’ विकासाच्या नावाखाली ही जागा सत्ताधाऱ्यांच्याच जवळच्या एका बिल्डरच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न सुरु झालाय का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
स्थानिकांचं काय म्हणणं आहे हे ऐकून न घेता जर मुख्यमंत्री हा निर्णय घेत असतील तर सरकार नेमकं कोणाचं आहे? सरकार हे जनतेचं आहे की बिल्डर्सचं? दुसरीकडे पुण्यातले बहुतांश रस्ते आता ऑप्टिक फायबर्स टाकण्यासाठी खोदले जाणार आहेत असं कळतंय. पण प्रश्न असा आहे की, एकीकडे पुणेकरांना याचा त्रास होणार असताना कंत्राटदारांकडून रस्ते खोदाईसाठी जो मोबदला मनपाकडून घेतला जातो, तो घेतला जाणार आहे का? की तो सरकारचा लाडका कंत्राटदार असल्याने त्याला सूट दिली जाणार आहे? असे अनेक सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत. तसंच हे जनतेचं नाही तर बिल्डर आणि कंत्राटदारांचेच सरकार आहे, अशी कठोर टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.


