 
                फलोदी सट्टा बाजाराने वाढवले टेन्शन; भाव फुटला…
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सत्ताधारी एनडीए आणि इंडिया आघाडीचा जोरदार प्रचार सुरू आहे. दोन्ही बाजूने आपलीच सत्ता येणार असल्याचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
ही निवडणूक सध्यातरी अटीतटीची वाटत असली तरी भारतातील प्रसिध्द फलोदी सट्टा बाजारात एकतर्फी हवा असल्याचे चित्र आहे.
देशातील विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांवर राजस्थानातील फलोदी येथील सट्टा बाजारात सट्टा लावला जातो. भारतातील हा मोठा सट्टा बाजार असल्याचे सांगितले जाते. सध्या या बाजाराने एनडीएच्या बाजूने कौल दिला आहे. बिहारमध्ये एनडीएची सत्ता येऊ शकते, अशी चर्चा सट्टेबाजारात असून त्यानुसार एनडीएवर अधिक पैसा लावला जात असल्याचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे.
एनडीएची सत्ता येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे एनडीएवर एक हजार रुपये सट्टा लावला तर त्यातून दुप्पट रिटर्न मिळू शकतो, असे वृत्तात म्हटले आहे. सट्टा बाजारातील अंदाजानुसार एनडीएला 243 पैकी तब्बल 128 ते 132 जागांवर यश मिळू शकते. बहुमतापेक्षा हा आकडा अधिक आहे. तर इंडिया आघाडी जेमतेम 100 जागांपर्यंत पोहचू शकते, असा अंदाज आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार, याची उत्सुकताही सट्टाबाजारात आहेत. सध्यातरी सर्वाधिक भाव नितीश कुमार यांच्यावर लावला जात आहे. हा भाव 40 ते 45 पैसे एवढा आहे. त्यांच्याजवळ दुसरे कुणी नाही. त्यामुळे सध्यातरी हा भाव स्थिर आहे, असे एनडीटीव्हीच्या वृत्ता म्हटले आहे. एनडीएमध्ये त्याव्यतिरिक्त इतर कुणालाही सट्टाबाजारात पसंती मिळताना दिसत नाही.
बिहारमध्ये प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जाहीरनामे प्रसिध्द केले जात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. पण सध्यातरी त्याचा फारसा परिणाम सट्टा बाजारात होताना दिसत नाही. अजूनही भाव स्थिर असून एनडीएला अधिक पसंती मिळत आहे.
दरम्यान, बिहारमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडी अशी थेट लढत आहे. आप, एमआयएम हे पक्ष मैदानात उतरले असले तरी त्यांचा फारसा प्रभाव नाही. राज्यात दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.



 दै चालु वार्ता
                                        दै चालु वार्ता                     
                 
                 
                