 
                ठेकेदारीचं कनेक्शन आलं समोर; स्वत: दिले होते पैसे…
पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. मुलांची सुखरुप सुटका करताना पोलिसांना त्याच्यावर गोळीबार करावा लागला होता.
तो मुलांवर हल्ल्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रोहित आर्य हा ठेकेदार होता. त्याच्याकडे शालेय शिक्षण विभागाची कामे होती, अशी माहिती आता समोर आली आहे.
शिवसेनेचे नेते दीपक केसरकर हे शालेय शिक्षणमंत्री असताना रोहित आर्य याला स्वच्छता मॉनिटर, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या योजनांअंतर्गत कामे देण्यात आली होती. पण त्याला नंतर बाजूला करण्यात आल्याचा आरोप झाला होता. त्याचे सुमारे दोन कोटी रुपये थकल्याचा दावा रोहित आर्य यानेच केला होता. त्यासाठी त्याने केसरकर यांच्या घरासमोर आंदोलन, उपोषणही केले होते, अशी माहिती आता समोर आली आहे. त्याने 2024 मध्ये पुण्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात आंदोलनही केले होते.
दीपक केसरकर यांनीही रोहित आर्य याला त्याच्या नावावरूनच लगेच ओळखलं. मीडियाशी बोलताना रोहितबाबत विचारले असता ते म्हणाले, शिक्षणमंत्री असताना मी चेकने त्यांना पैसे दिले आहे. त्यांचा २ कोटींचा दावा योग्य वाटत नाही. त्यांनी डिपार्टमेंटशी बोलावे. पण अशाप्रकारे मुलांना ओलीस ठेवणे योग्य नाही. शासनाकडचे कुठलेही पैसे बुडत नाही. शासनाकडे त्याने बाजू मांडावे, असे केसरकरांनी स्पष्ट केले होते.
नियमाप्रमाणेच शासनाचे पैसे मिळतात. त्यानुसार त्यांना पैसे मिळाले असतील. पैसे मिळाले नसतील तर त्यांनी डिपार्टमेंटकडे जावे, असेही त्यांनी सांगितले. त्याने पूर्वी उपोषणही केले होते. एक व्यक्तिगत सहानुभूती म्हणून मी माझ्या खात्यातून पैसे दिले होते. शासनाच्या नियमाचे पालन करावेच लागते, असे केसरकर म्हणाले.
दरम्यान, रोहित आर्य याच्या तावडीतून ओलीस ठेवण्यात आलेल्या मुलांची सुटका करताना पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यामध्ये रोहितचा मृत्यू झाला आहे. त्याने ओलीस ठेवण्यात आलेल्या सर्व 17 मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



 दै चालु वार्ता
                                        दै चालु वार्ता                     
                 
                 
                