शातील कोट्यवधी नागरिकांना प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम् या गीताला 31 ऑक्टोबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण झाले आहेत. मातृभाषेप्रतीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आजही अनेक शाळा, शासकीय कार्यालयांत वंदे मातरम् हे गीत आवडीने आणि उत्साहाने गायले जाते.
स्वातंत्र्यलढ्यात तर अनेक स्वातंत्र्यसैनिकांना या गीतानेच प्रेरणा दिलेली आहे. याच गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी संघाच्या सर्वच स्वयंसेवकांना वंदे मातरम् या गाण्याच्या प्रेरणा प्रत्येकाच्या हृदयात जागृत करून राष्ट्राच्या निर्माणात सक्रिय व्हावे असे आवाहन केले आहे. तसेच वंदे मातरम् या गीताला 150 पूर्ण होण्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
वंदे मातरम् गीत म्हणजे…
वंदे मातरम् हे एक मातृभूमीची पूजा करणारा तसेच संपूर्ण राष्ट्रीय जीवनात चेतना निर्माण करणारे मंत्र आहे. वंदे मातरम् या रचनेला 150 वर्ष पूर्ण झाले आहेत. याच निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वंदे मातरम् हे गीत लिहिणारे बंकिमचंद्र चटोपध्याय यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. तसेच आम्ही त्यांच्याप्रती श्रद्धासुमन अर्पित करतो. या गीताची रचना 1875 साली करण्यात आली. तसेच 1896 साली हे गीत काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रकवी रविंद्रनाथ टागोर यांनी स्वत: म्हणून दाखवले होते. तेव्हापासून हे गीत देशभक्तीचे मंत्र राहिलेले आहे. सोबतच हे गीत एक राष्ट्रीय घोषणा, राष्ट्रीय चेतना, राष्ट्राच्या आत्म्याचा ध्वनी बनलेले आहे, अशा भावना यावेळी होसबाळे यांनी व्यक्त केल्या.
वंदे मातरम् गीताचे महत्त्व किती?
तसेच बंग-भंग आंदोलन तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वच सैनिकांचे वंदे मातरम् हे एक घोषवाक्यच झाले होते. महर्षी अरविंद, मॅडम भिकाजी कामा, महाकवि सुब्रमण्यम भारती, लाला हरदायाल, लाला लाजपत राय असे विद्वान आपल्या पत्रावर वंदे मातरम् असे लिहायचे. यावरून वंदे मातरम् या उद्घोषाचे महत्त्व लक्षात येईल. महात्मा गांधीजीदेखील अनेक वर्षे आपल्या पत्राचा शेवट करताना वंदे मातरम् असे लिहायचे, असेही यावेळ होसबाळे यांनी सांगितले.
स्वयंसेवकांना केले आवाहन
वंदे मातरम् हे राष्ट्राच्या आत्म्याचे गीत आहे. या गीतामुळे प्रत्येकालाच प्रेरणा मिळते. आपल्या दीव्य प्रभावामुळेच हे गीत 150 वर्षानंतरही संपूर्ण समाजाला राष्ट्राप्रती समर्पणाच्या भावनेने ओतप्रोत ठेवण्याचे काम करते. आज प्रदेश, भाषा, जात आदी संकुचिततावादी गोष्टींचा आधार घेत विभाजनाची प्रवृत्ती वाढत आहे. अशा अस्थितीत वंदे मातरम् हे समाजाला एकतेच्या सूत्रात बांधणारे एक अनोखे असे सूत्र आहे, असे मत होसबळे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी या गीताला 150 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने देशभरात होणाऱ्या कार्यक्रमात संघाच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


