लवकरच करणार घोषणा ?
स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल वाजले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका 2 डिसेंबरला होणार आहेत. तर त्यानंतर दुसऱ्या टप्प्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत तर तिसऱ्या टप्प्यात राज्यातील महापालिकेच्या निवडणूक होणार आहेत.
चार वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकीला मुहूर्त लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे.
या निवडणुकीच्या तयारीत भाजपने मोठी आघाडी घेतली असून स्थानिकच्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान भाजपने राज्यातील नगराध्यक्षपदासाठीच्या इच्छुक असलेल्या तीन उमेदवारांची नावे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवली आहेत. येत्या काळात या तीन जणांच्या नावावर स्थानिक पातळीवर सर्वेक्षण करून आघाडीवर असलेले एक नाव फायनल करून उमेदवाराची घोषणा लवकरच प्रदेश पातळीवरून केली जाणार आहे त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्याशिवाय ज्याठिकाणी भाजपकडे सक्षम उमेदवार नसेल त्याठिकाणी महायुतीमधील मित्रपक्षाला संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्राने दिली.
राज्यातील 244 नगरपालिका व 44 नागरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. त्यामध्ये भाजपने मात्र मोठी आघाडी घेतली आहे. निवडणुकीची घोषणा मंगळवारी करण्यात आली. मात्र त्यापूर्वीच 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक नगरपालिकेच्या शहरांत भाजपचे स्थानिक आमदार, जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांना पाठविण्यात आले होते. त्यांनी प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायतींसाठीचे थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठीचे नावे भाजपने तयार ठेवली आहेत, प्रत्येक शहरात गेलेल्या पक्षाच्या निरीक्षकांनी तीन-तीन नावे लिफाफ्यात बंद करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिली आहेत.
या निवडणुका असलेल्या प्रत्येक शहरात भाजपची 61 जणांची कार्यकारिणी सक्रिय आहे. त्यामध्ये विविध आघाड्यांच्या अध्यक्षांचा समावेश आहे. या 61 जणांनी त्या शहराचे रहिवासी असलेले जिल्हा पदाधिकारी, शहर पदाधिकारी यांच्याशी समोरासमोर चर्चा करून नगराध्यक्षपदासाठीचे तीन योग्य उमेदवार कोण, हे या निरीक्षकांनी जाणून घेतले. त्यानंतर शॉर्टलिस्ट करून ही यादी प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आली असल्याचे समजते.
या सर्व नगरपालिकेच्या शहरातून गेलेल्या तीन-तीन नावांविषयी मतदारांमध्ये काय भावना आहे. त्या तिघांपैकी कोण क्रमांक एकला आहे. याबाबत प्रदेश भाजपकडून (BJP) दोन-तीन दिवसांत सर्वेक्षण केले जाणार आहे. या तीन नावांव्यतिरिक्त एखादी प्रभावी व्यक्ती योग्य उमेदवार ठरू शकते काय, याचीही चाचपणी केली जाणार आहे. विशेषतः भाजपमध्ये सक्रिय नसलेल्या पण समाजात लोकप्रिय असलेले नाव सर्वेक्षणातून पुढे आल्यास त्या व्यक्तींला उमेदवारी देण्यावरही विचार केला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
यासाठी सर्वेक्षण ठरणार महत्त्वाचे
त्याशिवाय या निवडणुकीत नगरसेवक म्हणून कोणाला संधी दिली पाहिजे? निवडणुकीसाठी कुठली रणनीती असली पाहिजे? याबाबतही मते जाणून घेण्यात आली. त्याशिवाय नगरपालिका निवडणुकीत महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करायची की नाही यावरही मते जाणून घेण्यात आली आहेत. येत्या काळात जर महायुती केली तर या दोन पक्षांचा कशा पद्धतीने समावेश करायचा यावर देखील चर्चा करण्यात आली. त्याशिवाय भाजपची ताकद असलेल्या ठिकाणी युती करायची नसेल तर स्वबळावर लढल्यास काय करायचे, याबाबत प्लँनिंग करण्यात आले.


