पण माझ्या मुलीचा काय दोष !
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर हे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका निर्णयामुळे आणि त्यानंतर होणाऱ्या टीकेमुळे प्रचंड व्यथित झाले आहेत. महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा नुकताच संगमनेर येथील ‘वसंत लॉन्स’ येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.
मात्र, या सोहळ्यावर झालेल्या लाखो रुपयांच्या खर्चामुळे आता त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. वारंवार कीर्तनातून “लग्न साध्या पद्धतीने करा,” असा उपदेश देणारे इंदुरीकर महाराज यांनी स्वतः मात्र लेकीचा साखरपुडा अतिशय शाही आणि आलिशान पद्धतीने केल्याने लोकांनी त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले.
शाही सोहळा ठरला टीकेचा विषय
ज्ञानेश्वरी यांच्या साखरपुड्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराजांचा राज्यभर संपर्क असल्याने शेकडो लोकांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. एकीकडे समाजाला साधेपणाचा उपदेश द्यायचा आणि दुसरीकडे स्वतःच्या कुटुंबासाठी मात्र पैशांची उधळण करायची, हा दुटप्पीपणा असल्याची भावना टीकाकारांनी व्यक्त केली होती.
इंदुरीकर महाराजांचे संतप्त स्पष्टीकरण –
या टीकेनंतर महाराजांनी स्पष्टीकरण दिले, मात्र टीका काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. या सततच्या बदनामीमुळे आणि टीकेमुळे इंदुरीकर महाराज प्रचंड दुःखी झाले आहेत. त्यांनी आपले दुःख व्यक्त करताना तीव्र संताप व्यक्त केला: “आम्ही किती कष्ट केले याचा लोकं कधीच विचार करत नाही. मी आठ दिवस लेकरांना भेटत नव्हतो. आता लोकं इतके खाली गेले की माझ्या मुलीच्या लग्नाच्या कपड्यावर बोलत आहेत. मला लावा ओ घोडे, माझा पिंड गेला, पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे?
साखरपुड्यासाठी कपडे नवऱ्याकडचे आणतात एवढी अक्कल पाहिजे. लोकं किती नालायक असावा, पण याला किती मर्यादा आहे. तीस वर्षात मी सगळ्या टीका सहन केल्या, पण आता माझ्या घरावर आलेत. माझ्यापर्यंत टीका ठीक, पण कुटुंबापर्यंत गेलं हे ठीक नाही. त्यामुळे मला अक्कल आली पाहिजे, म्हणून मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे.”
तीस वर्षांची कीर्तन सेवा थांबणार?
इंदुरीकर महाराजांनी दिलेल्या या संतप्त उत्तरावरून त्यांची मनःस्थिती स्पष्ट होते. कुटुंबाला लक्ष्य केल्याने ते इतके दुखावले आहेत की, त्यांनी आता तीन दशके सुरू असलेली कीर्तन सेवा थांबवण्याचे संकेत दिले आहेत. ते येत्या दोन-तीन दिवसांत यासंदर्भात एक क्लिप सोशल मीडियावर टाकणार असल्याचेही बोलून दाखवले आहे.
साध्या राहणीमानाचा उपदेश देणाऱ्या महाराजांच्या कृतीत विसंगती दिसून आल्याने त्यांच्यावर होणारी टीका थांबलेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराज खरोखरच आपला ‘फेटा’ खाली ठेवण्याचा मोठा निर्णय घेणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


