इगतपुरी प्रतिनिधी :- विकास पुणेकर
इगतपुरी :- इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या दिनांक १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी ६ अर्ज दाखल झाले आहेत. तर नगरसेवक पदासाठी ८३ अर्ज दाखल झाले.
निवडणुक प्रक्रीयेत अर्ज बाद होऊ नये म्हणून एकाच उमेदवाराने दोन ते तीन अर्ज दाखल केले आहेत. दाखल करण्यात आलेल्या सर्व अर्जाची मंगळवारी (दि. १८) छाणणी करण्यात येणार असून अनेक उमेदवारांनी दोन ते तीन अर्ज दाखल केले असून छाणणीमध्ये एकच अर्ज वैध ठरवण्यात येईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली आहे.
अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने इगतपुरी नगरपरिषद कार्यालया बाहेर तुफान गर्दी झाली होती. काँग्रेस व शिवसेना (उबाठा) यांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात रॅली काढून शक्ती प्रदर्शन करीत नगरपरिषद कार्यालयात दाखल झाले होते. त्यामुळे या ठिकाणी गर्दी झाल्याने पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतच वेळ देण्यात आल्याने तीन वाजेनंतर आलेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिसांनी प्रवेश नाकारल्याचे दिसून आले.


