पटणा 02 एप्रिल (हिं.स.)। बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आता राज्यसभेत जाणार असल्याने त्यांच्या सुरक्षेत बदल करण्यात आला आहे. आता मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना झेड+ श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे.
यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने पोलिस महासंचालकांना (DGP) आदेश जारी केले आहेत. जारी करण्यात आलेल्या निर्देशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, त्यांना बिहार स्पेशल सिक्युरिटी अॅक्ट-2000 अंतर्गत सुरक्षा देण्यात येईल, जी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतरही कायम राहणार आहे.
बिहार सरकारच्या गृह विभागाने यासंबंधी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत आगामी काळात नीतीश कुमार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या आदेशामुळे ते लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी झेड+ श्रेणीची कडक सुरक्षा व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सुरक्षाव्यवस्थेत त्यांच्या संरक्षणासाठी ५५ सुरक्षाकर्मी तैनात करण्यात येणार असून त्यामध्ये १० हून अधिक NSG (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) कमांडो सहभागी असतील.
पोलिस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, “बिहार स्पेशल सिक्युरिटी अॅक्ट-2000 अंतर्गत नीतीश कुमार यांना सुरक्षा प्रदान करण्यात येईल. नीतीश कुमार सध्या राज्यसभेसाठी निवडून आले आहेत. येत्या काळात ते बिहार विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा तसेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारतील.”अधिसूचनेत असेही म्हटले आहे की, नीतीश कुमार यांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर त्यांना झेड+ श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला राज्यसभेसाठी निवडून आलेल्या मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी सोमवारी बिहार विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. जनता दल (युनायटेड) चे राष्ट्रीय अध्यक्ष नीतीश कुमार यांनी विधान परिषदेचे सदस्यत्व सोडल्यानंतर राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.नीतीश कुमार यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्यांकडून काही काळापासून संवैधानिक तरतुदींचा हवाला देत असे संकेत दिले जात आहेत की, एखादी व्यक्ती विधानसभा किंवा विधान परिषदेची सदस्य नसतानाही ६ महिन्यांपर्यंत मुख्यमंत्री पदावर राहू शकते.
