मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. अमेरिकेचा १५ कलमी शांतता प्रस्ताव फेटाळून लावत इराणने स्वतःचा १० कलमी प्रतिप्रस्ताव सादर केला आहे.
यामध्ये इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर २० लाख डॉलरचा प्रचंड ‘सुरक्षा टॅक्स’ आकारण्याची अजब अट घातली आहे.
न्यूज एजन्सी ‘इराना’नुसार, इराणने तात्पुरत्या युद्धविरामाऐवजी युद्ध कायमस्वरूपी थांबवण्याची मागणी केली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित वाहतुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारून प्रत्येक जहाजाकडून कर वसूल केला जाईल. हा निधी ओमानसोबत विभागला जाणार असून, त्याचा वापर युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी केला जाईल. याशिवाय, अण्वस्त्र प्रसारबंदी करारांतर्गत (एनपीटी) युरेनियम समृद्धीकरणाला मान्यता आणि लेबनॉनमधील हिजबुल्लावरील इस्रायली हल्ले थांबवण्याची अटही इराणने ठेवली आहे.
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा हा प्रस्ताव फेटाळत आक्रमक पवित्रा घेतला आहे. “इराणला एका रात्रीत संपवले जाऊ शकते आणि ती रात्र उद्याची असू शकते,” असा इशारा त्यांनी दिला आहे. जर बुधवार मध्यरात्रीपर्यंत कोणताही ठोस करार झाला नाही, तर इराणचे सर्व पूल आणि वीज प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. या संघर्षामुळे जागतिक पातळीवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
