हजारो कोटींची संपत्ती ‘अनलॉक’ होणार; शापूरजी पालोनजींच्या वक्तव्याने दलाल स्ट्रीटवर खळबळ…
टाटा सन्स (Tata Sons)ला शेअर बाजारात लिस्ट करण्याच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा वेग आला आहे. मुंबईतून जारी केलेल्या एका महत्त्वाच्या मीडिया निवेदनात शापूरजी पालोनजी मिस्त्री यांनी पुन्हा एकदा टाटा सन्सच्या लिस्टिंगची जोरदार वकिली केली आहे.
त्यांच्या मते हा निर्णय केवळ नियमांची पूर्तता करण्यासाठी नसून समूहासाठी आवश्यक आणि सकारात्मक बदल ठरेल.
नेमकं काय म्हटलं निवेदनात?
मिस्त्री यांनी स्पष्टपणे सांगितले की आतापर्यंत असा कोणताही ठोस आणि तथ्यांवर आधारित कारण समोर आलेले नाही. ज्यामुळे टाटा सन्सच्या पब्लिक लिस्टिंगमुळे ट्रस्ट्सच्या हितांना धक्का बसेल किंवा त्यांच्या लाभार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होईल. त्यांच्या मते, या प्रक्रियेमुळे कॉर्पोरेट गव्हर्नन्स अधिक मजबूत होईल, पारदर्शकता वाढेल आणि जबाबदारीची जाणीवही अधिक स्पष्ट होईल. त्यांनी पुढे सांगितले की हे सर्व मुद्दे टाटा समूहाच्या मूलभूत तत्त्वांमध्येच समाविष्ट आहेत.
लोकांच्या हितासाठी लिस्टिंग महत्त्वाची
आपली भूमिका स्पष्ट करताना मिस्त्री म्हणाले की टाटा सन्सचे लिस्टिंग हे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे आहे. पब्लिक लिस्टेड होल्डिंग कंपनी झाल्यास बोर्डची जबाबदारी अधिक निश्चित होईल. यामुळे गुंतवणूकदारांचा आधार वाढेल आणि सर्व भागधारकांच्या दीर्घकालीन वाढीला चालना मिळेल. तसेच या निर्णयामुळे लाखो किरकोळ गुंतवणूकदारांसाठी मूल्यनिर्मिती होईल. याशिवाय टाटा ट्रस्टसाठी लाभांशाची प्रवाह अधिक मजबूत आणि पारदर्शक बनेल. ज्यामुळे सामाजिक आणि परोपकारी उपक्रमांना अधिक गती मिळेल.
लिस्टिंगसाठी RBI कडून निर्देशांची अपेक्षा
मिस्त्री यांनी पुढे सांगितले की विश्वासावर उभ्या असलेल्या या समूहाची मजबुती RBI च्या नियमांनुसार लिस्टिंगमुळेच अधिक वाढेल. त्यांनी असेही नमूद केले की टाटा सन्सच्या नेतृत्वाशी लिस्टिंगबाबत चर्चा सुरू आहे. तसेच RBI कडून यासंदर्भात स्पष्ट निर्देश येण्याची अपेक्षा व्यक्त करत त्यांनी म्हटले की, भारत सरकार आणि RBI या मुद्द्यावर ठोस आणि स्पष्ट निर्णय घेतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
नेमका वाद काय आहे?
टाटा सन्सच्या लिस्टिंगचा मुद्दा अचानक निर्माण झालेला नाही. गेल्या काही वर्षांपासून नियम आणि कॉर्पोरेट रचनेशी संबंधित हा एक गुंतागुंतीचा विषय बनला आहे. टाटा सन्सला Core Investment Company (CIC) म्हणजेच एक प्रकारची NBFC (नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी) मानले जाते. RBI च्या नियमांनुसार मोठ्या आणि सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट NBFC कंपन्यांना काही अटींनुसार शेअर बाजारात सूचीबद्ध होणे आवश्यक असते.
मात्र टाटा सन्सने वारंवार स्पष्ट केले आहे की कंपनीला स्वतःला एक प्रायव्हेट होल्डिंग कंपनी म्हणूनच कायम ठेवायचे आहे. कंपनीच्या मते लिस्टिंगमुळे समूहाची रचना अधिक गुंतागुंतीची होऊ शकते आणि टाटा ट्रस्टची भूमिका प्रभावित होऊ शकते.
