महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा निवडणुकीनं ढवळून निघणार आहे. येत्या काही दिवसात राज्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून २६ नवीन आमदार मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळ अत्यंत धामधुमीचा ठरणार आहे.
विधान परिषदेच्या रिक्त जागा भरण्यासाठी आता मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील काही आठवड्यात २६ जागांसाठी निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. यामध्ये विधानसभेच्या सदस्यांमधून निवडून द्यायच्या ९ जागा आणि प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांचा समावेश आहे.
९ जागांचा कार्यकाळ संपणार; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष
येत्या १३ मे २०२६ रोजी विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे आणि राजेश राठोड यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. विधानसभेतील सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार, भाजपच्या पारड्यात ५ जागा जाण्याची शक्यता आहे, तर शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडी १ जागा जिंकू शकते. मात्र, राष्ट्रवादीकडे अतिरिक्त १३ मते असल्याने आणि महायुतीने अधिक उमेदवार दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर असून, चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
१७ जागांचा अडीच वर्षांचा वनवास संपणार?
गेल्या अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्याने या जागांवर निवडणूक होऊ शकली नव्हती. मात्र, आता ७५ टक्के मतदारांच्या निकषाचा नवा नियम लागू करून केंद्रीय निवडणूक आयोग या जागा भरण्याच्या तयारीत आहे. सोलापूर, पुणे, नाशिक, नागपूर आणि ठाणे यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांचा यात समावेश आहे. २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका अद्याप बाकी असल्या तरी, आयोगाच्या नवीन धोरणानुसार १७ जागांची निवडणूक घेण्यात कोणतीही तांत्रिक अडचण नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजी नगर-जालना, नागपूर या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विधान परिषद निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
राजकीय समीकरणे बदलणार
पुढील आठवड्यात या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २७ जुलै २०३० पर्यंत कार्यकाळ असलेल्या या जागांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुती आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर महाविकास आघाडी जास्तीत जास्त जागा खेचून आणण्यासाठी रणनीती आखत आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जागांवर यावेळी सर्वांचे लक्ष असेल.
