पाहा ओमानच्या आखातात रातोरात काय घडलं ?
जागतिक राजकारणाच्या पटावर सध्या एक अत्यंत स्फोटक खेळ सुरू आहे.
ओमानचा समुद्र आणि होर्मुझची सामुद्रधुनी आता केवळ पाण्याचे मार्ग राहिलेले नाहीत, तर ते अमेरिका आणि इराण (US-Israel Iran War) यांच्यातील महासंग्रामाचे रणांगण बनले आहेत. अमेरिकेने इराणचे मालवाहू जहाज जप्त करण्याची चूक केली आणि इराणने काही तासांतच आकाशातून मृत्यूचा पाऊस पाडत अमेरिकन नौदलावर थेट ड्रोन हल्ले केले. या घटनेने केवळ आखाती देशांनाच नव्हे, तर संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. इस्लामाबादमध्ये शांतता चर्चेचे वारे वाहत असतानाच, प्रत्यक्ष समुद्रात मात्र युद्धाच्या तोफा धडधडू लागल्या आहेत.
ठिणगी कशी पडली? ‘तुस्का’ जहाजाची जप्ती
या संपूर्ण थराराला सुरुवात झाली ती अमेरिकेच्या एका अत्यंत आक्रमक कारवाईने. अमेरिकन सैन्याने ओमानच्या समुद्रात इराणचा ध्वज असलेल्या ‘तुस्का’ (Tuska) नावाच्या व्यापारी जहाजाला अडवले आणि मरीन सैनिकांनी त्यावर जबरदस्तीने ताबा मिळवला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईचे समर्थन करताना म्हटले की, हे जहाज अमेरिकेने लादलेली नौदल नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करत होते. अमेरिकेने गेल्या काही दिवसांपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांची नाकेबंदी केली आहे. पण ट्रम्प यांच्या या कारवाईने इराणच्या संतापाचा बांध फोडला.
इराणचा रुद्रावतार: अमेरिकन नौदलावर ‘ड्रोन स्ट्राईक’
आपले जहाज अमेरिकेने ओलीस ठेवल्याचे पाहताच इराणने शांत बसण्याऐवजी अत्यंत आक्रमक आणि विध्वंसक मार्ग निवडला. इराणी वृत्तसंस्था ‘तस्निम’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या सैन्याने कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट ओमानच्या समुद्रात तैनात असलेल्या अमेरिकन लष्करी जहाजे आणि नौदलाच्या विमानांवर स्वार्म ड्रोन्सचा (Swarm Drones) हल्ला चढवला. हा हल्ला इतका अचानक होता की अमेरिकन सैन्याला सावरायलाही वेळ मिळाला नाही. इराणने किती ड्रोन वापरले आणि अमेरिकेचे नेमके किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप गुलदस्त्यात असली, तरी इराणने दिलेला संदेश स्पष्ट आहे’ अमेरिकेकडून होणाऱ्या कोणत्याही आक्रमकतेला आता खंबीर आणि जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल.
ही तर अमेरिकेची सशस्त्र चाचेगिरी !
इराणच्या संयुक्त लष्करी कमांड, ‘खतम अल-अंबिया’ने या संपूर्ण प्रकरणावर तीव्र शब्दांत आगपाखड केली आहे. त्यांनी अमेरिकेच्या जहाज जप्तीला थेट ‘सशस्त्र चाचेगिरी’ ठरवले आहे. विशेष म्हणजे, सध्या दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांची शस्त्रसंधी लागू होती. मात्र, अमेरिकेने स्वतःच्याच वचनाचे उल्लंघन करत जहाज पकडल्याचा इराणचा आरोप आहे. इराणने २८ फेब्रुवारीपासून या सागरी मार्गावर आपले नियंत्रण मजबूत केले होते, मात्र अमेरिकेच्या सततच्या हस्तक्षेपाने आता या प्रदेशात केवळ शस्त्रांचीच भाषा बोलली जात आहे.
जागतिक अर्थव्यवस्था आणि माणसांच्या जगण्यावर सावट
हा संघर्ष केवळ दोन देशांपुरता मर्यादित नाही. होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक तेल पुरवठ्याची मुख्य रक्तवाहिनी आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे आणि आता इराणच्या ड्रोन हल्ल्यांमुळे इथून जाणारा व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे. याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर आणि पर्यायाने सामान्य माणसाच्या जगण्यावर होणार आहे. पाकिस्तानमध्ये दोन्ही बाजू शांततेसाठी चर्चेच्या टेबलावर बसणार होत्या, पण आता या ताज्या बॉम्बफेकीनंतर त्या चर्चेचे भवितव्यही अंधारात बुडाले आहे. जगावर तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार निर्माण झाली असून, पुढचे काही तास जागतिक सुरक्षेसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
