
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा : मृग नक्षत्राच्या पावसास प्रारंभ झाला असून दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसात आहे. तालुक्यात वेगवेगळ्या दोन ठिकाणी वीज कोसळून सहा जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना दि. ११ रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास घडली.
जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राच्या पावसाला सुरूवात होत असते मात्र यंदा पावसाने सुरुवात केली असली तरी अद्याप पर्यंत तरी म्हणावा तसा पावसाळा सुरू झाला नाही. मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात वादळी वाऱ्यासह व मेघ गर्जनेसह पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. दि. ११ रोजी शनिवारी सकाळ पासूनच कोरडे वातावरण होते. अचानक दुपारी आकाशात काळे कुट्ट ढग जमुन वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात पावसास सुरुवात झाली.
दुपारी अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान तालुक्यातील माळेगाव यात्रा शिवारातील शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या दुधाबाई हनुमंत चव्हाण यांच्या तीन गायी व एक म्हैस तर डोंगरगाव तांडा येथील गोविंद कंटीराम चव्हाण यांच्या शेतात बांधलेली दोन बैल वीज पडून मृत्युमुखी पडले. अशी माहिती लोहा तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागातून देण्यात आली. सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी संबंधित तलाठ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती नायब तहसिलदार अशोक मोकले यांनी दिली.