दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सारख्या महापुरुषांचा वेळोवेळी अवमान करणाऱ्या राज्यपालांना तात्काळ महाराष्ट्राच्या बाहेर हाकला, अशी विनंती नव्हे तर मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
छत्रपती संभाजी राजे हे एका कार्यक्रमासाठी आज परभणीत होते. त्यावेळी त्यांनी अत्यंत त्वेषाने हे उद्गार काढून राज्यपाल कोश्यारींप्रति आपला राग व्यक्त केला आहे.
राज्यपालपदी कार्यरत असणाऱ्या व्यक्तीने आपल्या जबाबदारीचे भान ठेऊन वागायला हवे. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त व्यक्तीने महाराष्ट्राच्या हिताचे व धोरणात्मक असे निर्णय घेणे आवश्यक आहे. राज्याचा कारभार हितावह चालला जावा यासाठी कार्यरत सरकारवर अंकुश ठेवून सुयोग्य असा कारभार चालवण्याचे निर्देश देणे महत्वाचे ठरते. सरकारशी समन्वय राखून राज्य प्रगतीपथावर कसे जावू शकेल यासाठीचे धोरणात्मक निर्णय घेऊन त्यासंबंधीचे मार्गदर्शन करणे गरजेचे ठरले जाणे स्वाभाविक असतांनाच त्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करुन भगतसिंग कोश्यारी यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांचा व छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्र पुरुषांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करुन त्यांचा वेळोवेळी जाणीवपूर्वक अवमान होईल असा अश्लाघ्य शब्दप्रयोग करणे म्हणजे हे निंदनीय असेच म्हणावे लागेल. असे सांगून छत्रपती संभाजी राजे यांनी याप्रकरणी थेट पंतप्रधान मोदी यांनाच साकडे घातले असून त्यांना कुठेही नियुक्त करा पण अगोदर महाराष्ट्राबाहेर हाकला आणि महाराष्ट्र व देशातील महापुरुषांना अवमान कारक अशा वक्तव्यां पासून वाचवा अशा प्रकारची विनंती केल्याचे ते म्हणाले.
भगतसिंग कोश्यारी यांनी यापूर्वीही एका कार्यक्रमात म.फुले व त्यांच्या धर्मपत्नी क्रातिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या तत्कालीन विवाहास अनुसरुन टिंगल टवाळी केल्याचे सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर काल एका जाहिर कार्यक्रमात देशाचे परिवहन व दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली त्यावेळी कोश्यारी त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य पुरुष होऊन गेले परंतु आता नितीन गडकरी व शरद पवार हेच शुर पुरुष आहेत असे म्हणाले. भगतसिंग कोश्यारी यांनी गडकरी व पवार यांची तुलना थेट शिवाजी महाराज यांच्याबरोबर करुन जी अक्कल पाळली ती राज्यपाल पदाला सुध्दा अशोभनीय ठरणारी अशीच म्हणावी लागेल. या व अशा वारंवार केले जाणाऱ्या बेताल वक्तव्यामुळे भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात राज्यात सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. पंतप्रधान मोदी याप्रकरणी कधी नि काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले जाणे स्वाभाविक आहे.
