दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी:श्रीकांत नाथे
अमरावती :- अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार,१८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आपले मतदान मतदारांनी बजावले असून २० डिसेंबरला प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
शनिवारी प्रशासनाची निवडणूकीची तयारी पूर्ण झाली होती.प्रत्येक मतदान केंद्रावर कर्मचारी तसेच पोलीसांचा तगडा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.गेले आठ दिवस जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार प्रचार पाहायला मिळाला दरम्यान ग्रामीण भागातले राजकारण जबरदस्त तापलेले होते.आता मतदार कोणाला कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आज सकाळ पासून जिल्ह्यात ग्रामीण भागांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला.अनेक मतदार केंद्रावर दुपारच्या सुमारास रांगा पाहायला मिळाल्यात.
*दुपार ३ वाजेपर्यंत ६२.४४ टक्के मतदान झाले होते*
अचलपूर विधानसभा मतदार संघातील आमदार बच्चू कडू,भातकुली आणि बडनेरा मतदार संघात आमदार रवी राणा,मेळघाटमध्ये आमदार राजकुमार पटेल,तिवसामध्ये काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर,दर्यापुरात आमदार बळवंत वानखडे,मोर्शीत आमदार देवेंद्र भुयार तर धामणगाव रेल्वे मतदार संघात भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या परीक्षा आहेत.याशिवाय भाजपचे विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांचाही प्रचारात सहभाग लक्षवेधी ठरला आहे.
अचलपूर मतदार संघ हा प्रहारचा म्हणजेच आमदार बच्चू कडू यांचा बालेकिल्ला.मात्र,या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनीही मोर्चेबांधणी आगामी विधानसभा निवडणूक समोर ठेवून केली असून ह्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.मोर्शी मतदार संघात राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले आमदार देवेंद्र भुयार यांच्यासमोर भाजपचे आव्हान असेल.भाजपचे नेते डॉ.अनिल बोंडे हे राज्यसभा सदस्य झाले असले,तरी त्यांचे या मतदार संघाकडे लक्ष आहे.शिंदे गटात प्रवेश करणारे राजेश वानखडे यांच्यासमोर तिवसा मतदार संघाचे आमदार यशोमती ठाकूर यांची तटबंदी भेदण्याचे आव्हान असेल.काँग्रेस,राष्ट्रवादी,भाजप शिवसेनेचे स्थानिक नेते ग्रामीण भागावर पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने मैदानात उतरले होते.सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होत असल्याने या निवडणुका मोठ्या चुरशीच्या होणार आहेत हे आधीच स्पष्ट झाले होते.
