
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीत धक्कादायक प्रकार समोर आला.उमेदवाराने प्रचार केला खराट्या चिन्हाचा आणि मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीनवर चित्र आले खटारा.या प्रकाराने संबंधित उमेदवाराने संताप व्यक्त करत तहसीलदारांकडे निवडणूक परत घेण्याची मागणी केली आहे.
अमरावती जिल्ह्यात २५७ ग्रामपंचायतींसाठी रविवार दिनांक १८ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.परंतु,यावेळी अमरावतीच्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत मध्ये मात्र चिन्ह दिलं एक अन् आलं दुसरं असाच प्रकार घडला.परंतु,या गोंधळाची आता राज्यभर चर्चा सुरू आहे.चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत असून सरपंच पद हे आदिवासींसाठी राखीव होते.या पदासाठी नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते तर त्यामध्ये चितराम चंदन बेठेकर यांनी स्वतःचे चिन्हं सोडून भलत्याच चिन्हांचा प्रचार केल्याने गोंधळ निर्माण झाला.बेठेकर यांनी खराटा चिन्हांचा प्रचार केला मात्र मशीनवर खराटा चिन्ह न दिसता खटारा चिन्हं दिसले त्यामूळे बेठेकर यांनी निवडणूक विभागविरुद्ध संताप व्यक्त केला असून सरपंच पदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी तहसीलदार यांना केली आहे.