
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात मुलाने पित्याला चाकूने सपासप वार करुन भोसले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.ए. शेख यांनी खूनी सावत्र मुलाला आज दि.२६ डिसेंबर २०२२ रोजी दोषी ठरवत आजीवन कारावास (जन्मठेप) व रुपये दहा हजारांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २ मे २०२० रोजी ही घटना घडली आहे. नसीर खान युसुफ खान पठाण याने परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुदरलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने या घटनेची माहिती जी पुढे आली आहे ती याप्रमाणे समजते की, दुपारी तीन वाजेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात आरोपी मैनूदीन याने पित्यावर चाकूने सपासप वार करुन निर्दयपणे भोसकले होते. सदर वेळी झालेला गोंगाट व रडारड एकूण नसीर खान याने सावत्र भाऊ मैनुद्दीन याच्याकडे धाव घेतली असता त्याने तो चाकू दाखवत कोणीही पुढे येऊ नका असे धमकावत आताच वडिलांना खल्लास केले असल्याचे सांगितले. त्यामुळे घरातील घाबरलेले कोणीही पुढे जाण्यास धजावले नाही. तेवढ्यात आपल्या हातातील चाकू किचनवर ठेऊन मैनुद्दीन याने घरातून पोबारा केला. जखमी अवस्थेतील पित्याला नसीर खान याने उपचारासाठी सरकारी दवाखान्यात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत्यू झाल्याचे घोषित केले.
याप्रकरणी नसीर खान याने आपल्या पित्याचा खूनी मैनोद्दीन याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात भादवि.१२९/२०२० कलम ३०२, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवला होता. दाखल फिर्यादीच्या अनुषंगाने तत्कालीन सपोनि. विशाल बहातरे यांनी सखोल तपास करुन दोषारोप दाखल केले होते.
याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे आठ साक्षिदारांची साक्ष नोंदवून ते तपासले गेले होते. त्यात वैद्यकीय अधिकारी, मुलगा व सून यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली गेली. आज सोमवार, दि. २६ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.शेख यांनी सर्व साक्ष व पुराव्याचे अवलोकन केले. आरोपी मैनोद्दीन युसूफ खान पठाण यास दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा व रुपये दहा हजारांचा आर्थिक दंड अशी सजा ठोठावण्यात आली.
सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता नीतीन खळीकर यांनी बाजू मांडली. जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन पैरवी अधिकारी कपिल शेळके, सउपोनि. सुरेश चव्हाण, शंभूदेव कातकडे, अंमलदार प्रमोद सूर्यवंशी आदींनी काम पाहिले.