
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:-समुद्रसपाटीपासून १८०० फूट उंचीवर असलेल्या जव्हारला पालघर जिल्ह्याचे मिनी महाबळेश्वर म्हणून थंड हवेचे ठिकाण असे ओळखले जाते.भौगोलिक दृष्टीने डोंगरदऱ्या,घनदाट जंगलामुळे येथील हवेत नेहेमीच गारवा आणि थंडावा जाणवत असतो.परंतु गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात निर्माण झालेला गारवा आणि रात्री थंडीची तीव्रता अधिकच वाढल्याने शहरासह ग्रामीण भागात पारंपारिक शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे दमट वातावरणाची अनुभूती होती.मात्र वातावरणातील काही प्रमाणात कमी झालेली थंडी मागील दोन-तीन दिवसांपासून पुन्हा परतली आहे.रात्रीच्या तापमानात घट झाल्याने अनेक ठिकाणी हुडहुडी भरली आहे.शहरातील नागरिक हे थंडीचा आनंद घेण्यासाठी हनुमान पॉइंट,सनसेट पॉइंट या ठिकाणी आवर्जून फेर फटका मारीत आहेत.
तालुक्यात किमान तापमान जवळपास १४ अंशावर पोहोचले आहे.रात्रीच्या सुमारास गारठा अधिकच वाढत असल्याने विशेषतः लहान बालके व वृद्धांना त्रास जाणवत आहे.तर शहरासह ग्रामीण भागातील नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेताना निदर्शनास येत आहे.कपाटात ठेवलेले उबदार कापडांचा वापर वाढला असुन काळजी घेतली जात आहे.
जव्हारला प्रवेश करताना पहाटे सजते दाट धुक्याची चादर
मागील दोन दिवसांपासून शहरात पहाटेच्या सुमारास धुक्यांचे प्रमाण वाढलेले आहे.थंडीचा कडाका वाढत असतानाच सकाळी दूरपर्यंत धुके दाटल्याचे निदर्शनास येत आहे.शहरात प्रवेश करतानाचे रस्ते धुक्यामध्ये हरवून गेल्याचे चित्र पहाटेला दिसून येत आहे.
थंडी रब्बीसाठी पोषक
तालुक्यात तापमानाचा परा घसरल्याने थंडी वाढली त्यामुळे रब्बीतील पिके बहरण्यास सुरुवात झाली आहे.थंडीमुळे रब्बी पिकास पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे.वाढती थंडी पाहता शेतकरी सुखावला आहे.मोगरा,भाजीपाला वर्गीय पिके,हरभरा पिके आता बहरताना दिसत आहेत.या थंडीचा रब्बी पिकांसाठी चांगला फायदा होणार आहे.
हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाने थंडीची लाट उसळण्याची शक्यता वर्तविली असल्याने पुढील काही दिवस बोचरी थंडी व गारठा सोसावा लागण्याची चिन्हे आहेत.
अशी घ्या काळजी
हिवाळा चांगला सुरू झाल्याने दिवस लहान व रात्र मोठी झाली आहे.पहाटे धुके पडत असल्याने फिरायला जाणाऱ्या लोकांना सर्दी,खोकल्याचाही त्रास होऊ शकतो.त्यादृष्टीने सतर्कता म्हणून तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधूनच फिरायला जाणे फायदेशीर ठरणार आहे.