
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर; देगलूर शहराच्या मध्यभागी असलेल्या गुंडा महाराज मठा शेजारी असलेले मटन मच्छी मार्केट हटविण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते दिगंबर कौरवार यांनी पुढाकार घेतला आहे. तर मच्छी मार्केट मधील व्यावसायिकांची बाजू भाजपेत्तर राजकीय मंडळींनी घेतल्यामुळे मच्छी मार्केट हटाव प्रकरणाला राजकीय रंग आला आहे.
देगलूर शहराच्या मध्यभागी गुंडा महाराजांचा मठ असून या मठाच्या पश्चिम दरवाज्याकडे मटण- मच्छी मार्केट आहे. गुंडा महाराजांचा मठ हा असंख्य हिंदूचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी दरवर्षी यात्रा भरते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशातून असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. येथे यात्रेबरोबरच दरवर्षी दिंडी देखील काढली जाते. या दिंडी मार्गावर मच्छी मार्केट असल्यामुळे मच्छी, मटण, हाडे असे अवशेष या भागात पडतात. मोकाट कुत्रे ते सर्वत्र पसरवून टाकतात. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटते घाणीचे साम्राज्य पसरते. एवढेच नव्हे तर भारतीय स्टेट बँक मोंढा एलआयसी ऑफिस मशिनरी
लाईन, कृषी सेवा केंद्र, भांडी मार्केटकडे जाणाऱ्या नागरिकांना अडथळा होतो, म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागातील मच्छी मार्केट इतरत्र हलविण्यात यावे, अशी मागणी भाजपा कार्यकर्ते दिगंबर कौरवार यांनी उपजिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षक, मुख्य अधिकारी देगलूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर कार्यवाही होत नसल्यामुळे दिगंबर कौरवार यांनी १५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष औरंगाबाद विभाग यांच्याकडे लेखी तक्रार केली १६ डिसेंबर
औरंगाबाद येथील या कार्यालयाने पोलीस अधीक्षक नांदेड यांना सदर प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना करून कार्यवाहीची प्रत औरंगाबाद कार्यालयास पाठविण्यास सांगितले. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरून मच्छी मार्केट हटविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. मच्छी मार्केट हटविण्यासाठी शासकीय पातळीवरून हालचालीस वेग येताच देगलूर येथील भाजपेत्तर पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत २७ • डिसेंबर रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलरपोलीस निरीक्षक देगलूर, मुख्याधिकारी देगलूर यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात गेल्या अनेक वर्षापासून मच्छी- मटण विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचा तो पारंपारिक व्यवसाय आहे. या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. आजपर्यंत कोणत्याही सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार करून त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु दिगंबर कौरवार यांनी जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करून समाजात फूट पाडण्यासाठी त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन काढून घेऊन त्यांना देशोधडीला लावण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. महाराष्ट्रात सत्ता असल्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करून नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना हाताशी धरून जाणून बुजून गोर-गरीबावर अन्याय सुरू केला आहे. परंतु जागा न देता व्यवसाय बंद करण्यासाठी मजबूर केले तर त्यांना मुला-बाळासह आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. दुर्दैवाने असे घडले तर याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनावर राहील. असा इशाराही त्यांनी या निवेदनात दिला आहे.