
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:शिक्षणामध्ये गुणांपेक्षा विद्यार्थ्यांची क्षमता तपासली जावी, त्यांच्या आवडीला कौशल्याला वाव मिळणारे शिक्षण असावे, असा सूर ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी चर्चासत्रात उमटला.
आंतरराष्ट्रीय शिक्षणावर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी प्रा. बी.व्ही. मोतीपवळे, ‘ग्लोबल नॉलेज’ चे अध्यक्ष रमेश बिरादार, पत्रकार शशिकांत पाटील, सोनू डगवाले उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिल्या जाणाऱ्या डेहाडूनमधील डून स्कूलचा विद्यार्थी ईशान मोतीपवळे याने आपले अनुभव सांगितले. ७० एकर क्षेत्रावरीलडेहराडूनच्या स्कूलमध्ये डॉक्टर, इंजिनिअर इतके मर्यादित स्वप्न नव्हे तर जागतिक दर्जाचे विचारवंत, संशोधक घडविले जातात. ७ वीसाठी देशभरातून १०० विद्यार्थी निवडले. त्यात ईशानचा समावेश आहे. त्या शाळेतील शैक्षणिक प्रयोगाची माहिती ईशानने दिली. तसेच लातूरमध्येही विद्यार्थी घडविणाऱ्या शाळा आहेत. शिक्षणाचे उत्तम वातावरण आहे. ग्लोबल नॉलेजने विद्यार्थ्यांची स्वयंअध्ययन पद्धती विकसित केली आहे. याच धर्तीवर पुढे जाण्याची गजर असल्याचे ईशान व उपस्थित पाहुण्यांनी सांगितले. यावेळी विवेक जगताप, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.