
पुणे:राजकारणातील घराणेशाहीला विरोध करणारी अनेक वक्तव्य आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. मोदी आणि शाह यांच्या या वक्तव्याचा आधार घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर तोफ डागली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, मला मोदींना इथे सभेला बोलवायचे आहे. याचे कारण म्हणजे त्यांना कोकणातली घराणेशाही दाखवायची आहे. डोक्यावर बाप आणि खांद्यावर मुले बसले आहे आणि आम्ही त्यांची चाकरी करतो. हे त्यांना चालते का? शिवसेनेची घराणेशाही तुम्हाला चालत नाही. नकली संतान म्हणता बाळासाहेबांचा अवमान करता. आव्हान मर्दानी द्यायचे असते हे कसले ,नुसते इकडून तिकडे वाटेल तिकडे जातात वाटेल ते बोलतात.
रस्त्यानेच येतो आणि रस्त्यानेच जातोय, उद्धव ठाकरेंनी चॅलेंज स्विकारले
काही दिवसांपूर्वी खासदार नारायण राणे यांनी कोकणात येताना हेलकॉप्टर न येता रस्त्याने या असे चँलेज दिले होते.उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंचे नाव न घेता उत्तर दिले आहे उद्धव ठाकरे म्हणाले, मला मध्ये कोणीतरी आव्हान दिले की हेलिकॉप्टरने येऊ नका, रस्त्याने या. होय मी रस्त्यानेच येतो आणि रस्त्यानेच जातोय… अरे रस्ता तर दुरुस्त करा …, मुंबई गोवा खड्ड्यात आहे. फक्त बोलघेवडे काहीही बोलत असतात.
महाराजांचा पुतळा म्हणजे ईव्हीएम वाटले का? ठाकरेंचा सवाल
अमित शाहांनी आमच्या सरकारने विकासाला स्थगिती दिली म्हटले. पण त्याच अमित शाहांनी मला विकासाची व्याख्या नेमकी काय आहे हे सांगावे.. अशुभ हाताने पुतळा उभारला . आठ महिन्याच्या आत पुतळा कोसळला. तो पुतळा नव्हता तो आमचा आत्मा, देव होता. वारा असल्यामुळे पुतळा कोसळला म्हणता लाज वाटली पाहिजे . महाराजांचे किल्ले अजूनही प्रेरणा देत अबाधित आहे. हे करंटे याना पुतळा उभारता येत नाही. पुतळा म्हणजे ईव्हीएम वाटले का जे मते देईल, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
महाराष्ट्र प्रेमी विरूद्ध महाराष्ट्र द्वेषी लढाई : उद्धव ठाकरे
ही लढाई महाराष्ट्र प्रेमी विरूद्ध महाराष्ट्र द्वेषी अशी लढाई आहे. महाराजांचा पुतळा पडल्यानंतर ही शिवद्रोही माणसं आदित्य आला तेव्हा बाहेर गोंधळ घालत होती. बाप लेक आदित्य पुतळा बघायला आले त्यावेळी पोलिसांना धमक्या देत होते. ही लोकं शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहेत, असंही ठाकरे म्हणाले.