
पुणे, ११ नोव्हेंबर २०२४: भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात “जी.आय.एस.च्या साहाय्याने शाश्वत विकासासाठी संशोधनाच्या संधी” या विषयावर आयोजित आठवडाभर चालणाऱ्या अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचा उद्घाटन समारंभ ११ नोव्हेंबर २०२४ रोजी उत्साहात पार पडला. या राष्ट्रीय प्रशिक्षणात विविध क्षेत्रांतील ४५ सहभागींसाठी प्रेरणादायी शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ झाला.
ए.आय.सी.टी.ई.च्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश शिक्षणतज्ज्ञ व संशोधकांना जीआयएस या अत्याधुनिक तंत्रज्ञानातील सखोल ज्ञान व कौशल्य प्रदान करणे असून, शाश्वत विकासामध्ये त्याच्या महत्त्वावर भर देणे हा आहे.
समारंभाला अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे भाऊ संस्थेचे संचालक, मा. डॉ. रवींद्र उतगीकर यांनी आपल्या मुख्य भाषणामध्ये शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी नाविन्यपूर्णता व जी.आय.एस.च्या भूमिकेवर प्रकाश टाकला. त्यांनी सहभागींसाठी संशोधन आणि अंमलबजावणीमध्ये धोरणात्मक व डेटा-आधारित दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. डॉ. पराग काळकर यांनी जी.आय.एस. तंत्रज्ञानाच्या शहरी नियोजन, पर्यावरण संवर्धन आणि संसाधन व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमधील परिवर्तनात्मक क्षमतेवर महत्त्वपूर्ण भाष्य केले.
भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले, “हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम शिक्षणतज्ज्ञ व संशोधकांना अत्याधुनिक साधने आणि ज्ञानाने सुसज्ज करण्याचा एक ऐतिहासिक उपक्रम आहे. जी.आय.एस. तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या धोरणांची सांगड घालून आजच्या जागतिक आव्हानांना नाविन्यपूर्ण उपाय देऊ शकतो.”
भारती विद्यापीठाच्या पर्यावरण शिक्षण व संशोधन संस्थेच्या प्राचार्या प्रा. डॉ. शमिता कुमार, उपप्राचार्या प्रा. डॉ. एस. एस. चोरगे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एम. पवार, तसेच विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. आर. पाटील, प्रा. डॉ. डी. डी. पुकळे आणि प्रा. डॉ. डी. ए. गोडसे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. सोनाली कदम यांच्या उत्कृष्ट नियोजनाबरोबरच, संपूर्ण प्राध्यापक टीमच्या सहकार्याने कार्यक्रम सुरळीत पार पडला. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रा. जयश्री जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. स्मिता गोड यांनी केले.