
पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील नैमित्तिक धर्मनशीलता आणि भ्रमणशीलतेमध्ये जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो, त्या दिवशी पौर्णिमा असेल, तर तो सर्वात मोठा ‘सुपरमून’ मानला जातो.
शुक्रवारी, 15 रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने अवकाशातील ही घटना खगोलप्रेमींना अनुभवता येणार आहे, अशी माहिती खगोलशास्त्र अभ्यासक सतीश नायक यांनी दिली.
नायक म्हणाले, असोसिएशन ऑफ फ्रेंडस् ऑफ एस्ट्रॉनॉमी गोवा आणि सार्वजनिक खगोलशास्त्र वेधशाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने अवकाशात घडत असलेल्या विविध घडामोडींचे सूक्ष्म निरीक्षण करण्यात येते. यात ‘सुपरमून’चा अनुभव घेणे हे दुर्लभ घटना मानली जाते. मोठ्या चंद्राच्या घटना वर्षभरात पौर्णिमेच्या निमित्ताने होतात. यंदा या वर्षातील शेवटचा सुपरमून पाहण्याची संधी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने खगोलप्रेमींना मिळणार आहे. त्यासाठी वातावरण स्वच्छ आणि कोरडे असणे अपेक्षित आहे. सर्वसाधारणपणे 15 नोव्हेंबरपर्यंत वातावरण स्वच्छ होते. त्यानंतरच खगोलशास्त्रीय निरीक्षणाला सुरुवात केली जाते. यंदाही आम्ही ते करणार आहोत, असेही नायक म्हणाले.